गडहिंग्लज: येथील शिवराज महाविद्यालयात बी.सी.ए. विभागाच्यावतीने शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांना पुण्यदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रारंभी ऐनापुरचे ज्येष्ठ नागरिक श्री शंकर पोवार यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक प्रा.बी.एस.पठाण यांनी केले. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन करताना म्हणाले- कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना खऱ्याअर्थी घडविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी बहुजन समाजाच्या विद्यार्थी हित जपण्यासाठी अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठामध्ये कमवा व शिका ही योजना सुरु करून अनेक विद्यार्थ्यांच्या करिअरला बळ देण्याची मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्यामुळे आज बहुजन समाजातील बहुसंख्य विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा या महान शिक्षणशार्दुल व्यक्तिमत्वाने समाजातील बहुजनांच्या शिक्षणासाठी महान कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी केले. यावेळी श्री सुरेश पोवार, डॉ.रंगराव हेंडगे यांनी कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या कार्याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, बी.सी.ए.विभाग प्रमुख प्रा.के.एस.देसाई, चंद्रकांत कोरडे, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमात संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांनी सर्वांचे आभार मानले.