आशिया चषकातील हायव्हॉल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, तेव्हा रोमांचक सामना पाहायला मिळत असतो. पण यावेळी भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. हा सामना होणार की नाही, अशी चिन्ह होती. अनेक क्रिकेट चाहत्यांनी या सामन्यावर बहिष्कार टाकला. पण शेवटी हा सामना झाला आणि भारताने एकतर्फी विजयाची नोंद केली. दरम्यान या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने हा विजय भारतीय लष्कराला समर्पित केला आहे.
सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत सूर्यकुमार यादव म्हणाला, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आप्तस्वकीय गमावलेल्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आजचा विजय भारतीय लष्कराला समर्पित करतो. त्यांनी अतुलनीय धैर्य दाखवलं. ते देशवासीयांसाठी प्रेरणास्थान आहेत. आम्ही मैदानात दमदार कामगिरी करून त्यांना अभिवादन करतो.."
एप्रिल महिन्यात जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये
झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले होते. याचं प्रत्तुत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं आणि पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. असं असताना भारत- पाकिस्तान सामन्याचे आयोजन करण्यात आले, हे क्रिकेट चाहत्यांना आवडलं नव्हतं. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी या सामन्यावर बहिष्कार टाकला. अनेक दिग्गज खेळाडूंनीही या सामन्याला विरोध केला होता. मात्र, भारत सरकारने अनुमती दिल्याने हा सामना पार पडला आणि भारतीय संघाने हा सामना जिंकला.