गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे 'व्यसन मुक्ती व अमली पदार्थ सेवन प्रतिबंध' या विषयावर एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलीस उपविभागीय अधिकारी रामदास इंगवले यांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देऊन त्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गडहिंग्लज विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री रामदास इंगवले उपस्थित होते. त्यांच्यासोबत गडहिंग्लज विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सागर पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते, या प्रसंगी शिवराज विद्यासंकुलाचे संचालक प्रा. विश्वजीत कुराडे, संचालिका प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. डी. पी. खेडकर यांची विशेष उपस्थिती होते.
अतिथी परिचय पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. महेश चौगुले यांनी करून दिला. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक पोलीस उपविभागीय अधिकारी रामदास इंगवले यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थामुळे होणारे सामाजिक, शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थाच्या आहारी जाण्यापासून कसे दूर रहावे, तसेच चांगले मित्र निवडण्याचे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना या गंभीर विषयावर पोलिसांची भूमिका समजावून सांगितली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाणिज्य विभागाच्या प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थाच्या धोक्यांबाबत जागरूकता निर्माण झाली. शेवटी आभार प्रा. डी पी खेडकर यांनी मानले.