वक्तृत्व स्पर्धेतून घडते उद्याचे नेतृत्व : डॉ. अनिलराव कुराडे

KolhapurLive

गडहिंग्लज - वक्तृत्व स्पर्धा ही सार्वजनिक बोलण्याची कला आहे. स्पर्धेमध्ये व्यक्त होण्यासाठी झालेल्या वाचनातून, चिंतनातून, मांडणीतून समकालीन सामाजिक प्रश्नांना भिडता येते आणि यातूनच पुढे जाऊन उद्याचे नेतृत्व घडते असे प्रतिपादन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी येथील शिवराज महाविद्यालयात कनिष्ठ विभाग स्तरावरील आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. स्पर्धेचे स्वागत ग्रंथपाल संदीप कुराडे यांनी केले तर प्रास्ताविक संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी केले.

या स्पर्धेत कु. प्रांजल दत्तात्रय पाटील (प्रथम), कु. श्रावणी आनंदा पाटील (द्वितीय), कु. नंदिनी प्रकाश पोटे (तृतीय), रोहित सुभाष इंगवले (उत्तेजनार्थ) यांनी अनुक्रमे यश मिळविले. स्पर्धेमध्ये एकूण ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी आभाळाएवढा राजा छत्रपती शाहू महाराज, थोर समाजसुधारक कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, माझं कॉलेज शिवराज कॉलेज (महाविद्यालयाची ६१ वर्षे) असे विषय ठेवले होते. विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले तर सहभागींना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. एस. एम. कदम म्हणाले, विद्यार्थ्यांनी महाविद्यालय जीवनात प्रचंड वाचन करावे. कारण ते उद्याच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक असते. वाचनातून आणि चिंतनातून वक्तृत्व स्पर्धेत यश तर मिळतेच त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो.

स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाच्या संभाजीराव माने, कनिष्ठ महाविद्यालय व ग्रंथालयामार्फत करण्यात आले होते. स्पर्धेचे पंच म्हणून डॉ. अशोक मोरमारे व प्रा. पौर्णिमा कुराडे-पाटील यांनी काम पहिले. स्पर्धा आयोजनासाठी प्रा. गीतादेवी देसाई आणि प्रा. प्रियांका जाधव यांनी परिश्रम घेतले. यावेळी श्री. सचिन काटे, प्रा. सुजाता जांगनुरे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचलन प्रा. स्वप्नील अर्दाळकर यांनी केले तर आभार प्रा. तानाजी भांदुरगे यांनी मानले.