गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात सदभावना दिनानिमित्त भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते तर संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे व संचालक प्रा.विश्वजित कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जी.जी.गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते हिंदी विभाग प्रमुख डॉ. एन.बी.एकिले यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या कार्याबाबत मार्गदर्शन करताना भारताची एकता व अखंडता, डिजीटल इंडिया, माहिती व तंत्रज्ञान, महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ३३ टक्के आरक्षण, श्रीलंका शांती समझोता १९८७ याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सदभावना दिवसानिमित्त सर्व धर्म, जाती, संप्रदाय, भाषा व अन्य क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय एकता व सांप्रदायिक सलोखा जपणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.
संस्थेचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी भारत देशासाठी गांधी घराण्याने केलेला त्याग विसरून चालणार नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी या देशाला आधुनिक तंत्रज्ञानाची देणगी देऊन क्रांतिकारी बदल घडविला. त्यामुळे आज जगभर आपले भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर आहेत. या देशाचा युवक सक्षम झाला पाहिजे यासाठी राजीव गांधी नेहमीच प्रयत्नशील राहिलेले आहेत असे प्रतिपादन केले.
यावेळी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, प्रा.पौर्णिमा पाटील, प्रा. अजित केसरकर, डॉ.वृषाली हेरेकर, डॉ.बी.एम.जाधव यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार प्रा.गिरीश झुरळे यांनी मानले.