वडरगेमध्ये रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न : ३२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

KolhapurLive


गडहिंग्लज प्रतिनिधी : 'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' असे समजले जाते. आज शहरातील रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुडवडा जाणवत आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या हेतूने वडरगे(ता-गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत सदस्य महादेव मोरे,त्यांचा मित्रपरिवार व लायन्स ब्लड बँक गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन आज(रविवार) वडरगेत करण्यात आले होते. 

आज झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये ३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर यावेळी लायन्स ब्लड बँकेच्या मॅनेजमेंटने रक्तदानाचे महत्व युवकांना व येथील ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर २८ युवकांनी तर चार महिलांनी रक्तदान केले. शिबिरामध्ये गावतील विविध तरुण मंडळाचे युवक सहभाग झाले होते. 

'या' महिलांनी केले रक्तदान...!

रक्तदान शिबिरामध्ये शक्यतो सर्वच ठिकाणी युवकांचा सहभाग आपल्याला जास्त पहायला मिळतो पण वडरगे येथील रक्तदान शिबिरात आज ग्रामपंचायत सदस्या पुष्पा संजय हजारे,भारती अनिल आडावकर,सरीता नामदेव पोवार व मयुरी विशाल रक्ताडे या महिलांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. त्यामुळे युवकांच्या बरोबर महिलांच्यातही रक्तदानाचे महत्व अधीरेखित होत असल्याचे स्पष्ट झाले.