गडहिंग्लज: येथील महाविद्यालयात वाणिज्य मंडळाच्यावतीने भित्तीपत्रकाचे उदघाटन शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे विभागप्रमुख डॉ. ए. एम. गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रारंभी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. डी. पी. खेडकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू सांगितला. या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे विभागप्रमुख डॉ. ए. एम. गुरव यांनी ‘वाणिज्य व व्यवस्थापनमधील करिअरच्या संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रात उपलब्ध असलेल्या १०० पेक्षा जास्त करिअरच्या संधींबद्दल सविस्तर माहिती दिली. वाणिज्य व व्यवस्थापन हे क्षेत्र जगभर व्यापलेले आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना देश-विदेशात अनेक संधी आहेत. विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य घडवायचे असेल तर स्वप्न बघा आणि ते सत्यात येण्यासाठी नियोजन करा. अभ्यास करण्याच्या वेळापत्रकात बदल करा असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी त्यांनी पदवी आणि नोकरी यातील फरक काय आहे याबाबत सविस्तर अशी माहिती दिली. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी योग्य दिशा मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास डॉ. एम. व्ही. राजे, डॉ. एस. डी. सावंत, डॉ.बी.एम.जाधव, प्रा सचिन चौगुले तसेच कॉमर्स विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पाहुण्यांची ओळख प्रा.सौ.बी.बी. वाटंगी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. एम. डी. चौगुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.