डॉ.जे.पी.नाईक हे विश्वगुरु व्यासांचे खरे वारसदार होते.सीतायणकार प्रा.किसनराव कुराडे

KolhapurLive
दरवर्षी गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा मान्य करून आपण आपल्याला घडविणाऱ्या गुरुजनांना अभिवंदन करीत असतो. हजारो वर्षापूर्वी महाभारत या नावाचे अजरामर साहित्य लेखन करणाऱ्या आचार्य व्यासांना केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात महान गुरु म्हणून मानले जाते. याचे कारण प्रत्येक पिढीला प्रेरणा देण्याची ताकद गुरुवर्य व्यासांच्या लेखणी व वाणीतून प्राप्त होत असते. स्वातंत्र्याबरोबर जन्माला आलेल्या पिढीमध्ये आमच्या जन्मभूमीतील व्यासांचे खरे वारस म्हणजे डॉ.जे.पी.नाईक हे होते. याचा अनुभव त्यांच्या सहवासातील काही सुवर्णक्षण अनुभवून व त्यांनी दिलेल्या संधीचे सुवर्ण संधीत रुपांतर करून जगण्याचे व जागविण्याचे भाग्य आपल्याला लाभलेले आहे. गारगोटीचे मौनी विद्यापीठ असो, कोल्हापूरचे ताराराणी विद्यापीठ असो किंवा गडहिंग्लजचे शिवराज कॉलेज असो ही आणि अशी विद्यापीठे निर्माण करण्याची बौद्धिक क्षमता बहिरेवाडीत जन्मलेल्या डॉ.जे.पी.नाईक यांनी सिद्ध व साध्य केलेली होती. म्हणून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी त्यांना दिल्लीला बोलावून घेऊन त्यांनीच तयार केलेल्या शिक्षणाचा आरखडा आमंलात आणण्याचा निर्णय घेतला. आपण सर्व या शैक्षणिक धोरणाचे लाभधारक आहोत. डॉ. नाईक यांच्या बुध्दीमतेची दखल घेऊन त्यांना जागतिक पातळीवरच्या युनोने शैक्षणिक सल्लागार म्हणून आमंत्रित केले होते. आज गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा आदर करीत असताना डॉ.जे.पी.नाईक यांचा आदर्श पुढच्या पिढीने स्वीकारावा अशी अपेक्षा सीतायणकार व शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी व्यक्त केली. या विद्या संकुलात डॉ.जे.पी.नाईक सभागृहात शिवराज महाविद्यालय व संभाजीराव माने ज्युनिअरमध्ये गुरुवंदना कार्यक्रम संपन्न झाला. सचिव डॉ.अनिलराव कुराडे, संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, शिवराज इंग्लिश मेडियमचे प्राचार्य श्री ए.बी.पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले. या कार्यक्रमात सर्व प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा.आशा पाटील, प्रा.तानाजी भांदुगरे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रा.जयवंत पाटील यांनी मानले.