मुंबईत शुक्रवारपर्यंत हलक्या सरींची शक्यता असली, तरी त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू वाढणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, शुक्रवारनंतर मुंबई, पुणे आणि पश्चिम घाटातील भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
सध्या मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. मात्र , आठवड्याच्या शेवटी, म्हणजेच शनिवार आणि रविवारी मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक आणि कोकणातील इतर भागात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. या भागात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत.
वायव्य बंगालच्या उपसागरात उत्तर ओडिशा, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे आज कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. तसेच अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य महाराष्ट्र ते मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ही प्रणाली पावसाला पोषक असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.