गडहिंग्लज: येथील शिवराज महाविद्यालय योग सेंटर व योग विद्याधाम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दैनंदिन योग शिबिराचे उदघाटन संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे होते. प्रारंभी कुंडीतील रोपाला मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून उदघाटन करण्यात आले. संस्थेच्या संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांनी स्वागत व प्रास्ताविकात योगाचे महत्व सांगितले. योग विद्या धामचे प्रमुख प्राचार्य सदानंद वाली यांनी आजच्या युवापिढीला योगाची नितांत गरज आहे. जीवनात आपण कसे जगावे याचे ज्ञान योगातून मिळते.माणसातील माणूसपण जपण्याचे कार्य योग करीत असते. आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी दिलेले योगाचे योगदान संपूर्ण जगाला समजले आहे. आपण सर्वसंपन्न जीवन जगण्यासाठी योगासन करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पस्थ केले. या कार्यक्रमात शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाला योगाची जोड देणे आवश्यक आहे. योगाच्या माध्यमातून एक प्रकारची वेगळीच उर्जा मिळ असते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव योगासन केल्यामुळे मिळतो आहे याचा अनुभव घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. योगामुळे जगण्याची योग्यत प्राप्त होते. या योगासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौध्दिक क्षमतेला पुष्टी मिळते यासाठी सर्वांनी या योग शिबिराचा लाभ घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. योगशिक्षिका श्रीमती शारदा आजारी यांनी स्त्रियांनी योगाच्या माध्यमातून सदृढ झाले पाहिजे. स्त्रियांनी आपल्या रोजच्या व्यापातून आपल्या आरोग्यासाठी योगासन करणे आवश्यक आहे. असे सांगून त्यांनी व्याधीमुक्त्तेसाठी, बुद्धी संवर्धनासाठी योगासन करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले. योगशिक्षक अरविंद सावळगी यांनी ओंकारचे महत्व सांगितले. यावेळी पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, प्रा.पौर्णिमा पाटील, डॉ.श्रद्धा पाटील, प्रा.सुजाता जांगनुरे, सौ.सीमा आजरी, सौ.सविता निकम यांच्यासह अन्य प्राध्यापिका,विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दर्शना बेलेकर, प्रा.सीमा कांबळे यांनी केले तर आभार प्रा.आशा पाटील यांनी मानले.