एटी फाउंडेशन तर्फे तीन दिवसीय मोफत निवासी फुटबॉल शिबीरआंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षिका अंजू तुरंबेकर यांनी खेडेगावातील मुलांना दिले थेट फुटबॉल प्रशिक्षण

KolhapurLive
एटी फाउंडेशन, कोल्हापूर या स्वंस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यामधील तीन तालुक्यातील निवडक खेडेगावातील ३० मुलामुलींसाठी तीन दिवसीय निवासी फुटबॉल शिबिर घेण्यात आले. आठ महिन्यापूर्वी एटी फाउंडेशन ने निवडक १० गावांमध्ये *व्हिलेज फुटबॉल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट* सुरू केला व फुटबॉल खेळाचे साहित्य देवून प्रशिक्षणाचे काम हाथी घेतले होते. अंजू तुरंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एटी फाउंडेशन च्या युवा लीडर्सनी गावोगावी प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. ह्याच प्रोग्राम मधून ३० मुलामुलींची निवड करून एटीएफ गिजवणे हायस्कूल सेंटर येथे कॅम्प भरवण्यात आला. तसेच शिबिरादरम्यान एटीएफ लीडर्सना देखील फुटबॉल प्रशिक्षणाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. 

शिबिरामध्ये फुटबॉल प्रशिक्षणासोबत मुलांना त्यांच्या सवयी, वागणे, आदर करणे, अभ्यास करणे, योग्य ते जेवणे, प्रामाणिक राहणे, समयसूचकता बाळगणे ह्या विषयांवर मजेदार एक्टिव्हिटीज द्वारे ज्ञान देण्यात आले.

फुटबॉलपटू, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका, एएफसी पॅनल मेंबर व एटी फाउंडेशन स्वंस्थापिका, अंजू तुरंबेकर यांनी आपल्या परदेशातील कामातील सीझन ब्रेक ची संधी साधून शिबिर राबविले. क्रीडाशिक्षक अनिल पाटील यांनी सहाय्य केले तर एटीएफ व्हिलेज लीडर्स अक्षय पावले, शैलेश दळवी, सानिका रेडेकर, वैभवी पाटील, श्रृती दिवटणकर, कस्तुरी कदम, कौशिक इक्के शिबिर पार पाडण्यास कष्ट घेतले.

अंजू तुरंबेकर म्हणाल्या, खेडेगावातील मुलांमध्ये खेळाची आवड अफाट आहे व जिद्द आणि आत्मविश्वास दिसून येतो. त्यांना योग्य ती दिशा दाखवणे व मार्गदर्शन देणे गरजेचे आहे. आजच्या युगात मोठ्या प्रमाणात पालक मुलांना खेळापासून दूर घेवून जात आहेत जे खूप घातक ठरत आहे. आमच्या कार्याद्वारे आम्ही मुलांना खेळ व अभ्यासा मधे समतोल राखणे तसेच जीवनशैलीचा विकास करणे शिकवत आहोत.