मध्ययुगीन काळामध्ये बाहेरुन येवून आमच्या भाषा शिकून घेवून आपल्यावर राज्य करणाऱ्यांची संख्या अधिक होती पण २0 व्या शतकात मात्र भारतातून सर्व जगभर जावून आपल्याला जे हवे ते साध्य करणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. जगातील असा कोणताही देश नाही कि ज्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भारतीय स्वतःला सिद्ध व साध्य करीत नाहीत. याचाच अर्थ नियतीने दिलेल्या जग जिंकण्याच्या या संधीचे असेच सुवर्ण संधीत रुपांतर कार्याचे असेल तर भावी पिढ्यांना शिक्षण देत व घेत असताना बहुभाषा सूत्राचा अवलंब करणे हेच भारतीयांच्या दृष्टीने वरदान ठरणार आहे. केवळ बाहेरचाच नव्हे तर देशांतर्गत शिक्षणाचे सूत्र ठरवीत असताना ही आपली अंतर्गत रचन लक्षात घेऊन किमान चार भाषा शिकविण्याचे सूत्र आंमलात आणले पाहिजे. राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी, मातृभाषा म्हणून मराठी, आंतराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजी व शेजारील प्रांतभाषा म्हणून कानडी, गुजराती असे सूत्र आंमलात आणले तर भविष्यात महाराष्ट्र हे खरोखरच महान मार्गदर्शक राष्ट्र ठरेल. असे विचार समाजशास्त्राचे अभ्यासक ज्येष्ठ लेखक प्रा.किसनराव कुराडे यांनी व्यक्त केले.
भडगाव येथील रानाभागातील प्राथमिक शाळा नंबर 2 मधील सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव गुरव यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. आपला बहुभाषिक विचार व्यक्त करीत असताना भारतामध्ये अस्तित्वात आलेली भाषावार प्रांतरचनाही त्यांनी स्पष्ट केली. अर्थात प्रांतांच्या सीमारेषा कागदावर निश्चित करण्यात आलेल्या असल्या तरीही या मिश्र बहुभाषिक प्रदेशात शेजारच्या भाषेचे किमान शिक्षण देणे व घेणे आवश्यक ठरते. कारण आपण मिश्र भाषिक आहोत. त्यामुळे सीमाभागातील शिक्षणाचे स्वरूप ठरवीत असताना मराठी बरोबर कानडी भाषेचेही आवश्यक शिक्षण उमलत्या वयात दिले घेतले पाहिजे. मात्र भाषेच्या नांवावर संकुचित भावना भडकावून पुढच्या पिढीचे नुकसान केले जाऊ नये असे विचार त्यांनी व्यक्त केले. असा चतुरभाषिक उपक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून शिवराज विद्या संकुलामध्ये सुरु करणार असल्याचीही घोषणा प्रा.किसनराव कुराडे यांनी केली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भडगांवचे सुपुत्र किसन महाराज, पंचायत समितीचे माजी सभापती श्री अमर चव्हाण, सरपंच वंदना शेंडूरे, आदर्श शिक्षक श्री निकम गुरुजी, श्री गुरव गुरुजी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रेक्षकांनी हे बहुभाषिक सूत्र टाळ्यांच्या गजरात स्वीकारले. यावेळी परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, अनेक शिक्षक, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.