गडहिंग्लज : यांत्रिकीकरणामुळे समाजातील संवेदना नष्ट होत आहे. संपूर्ण समाज निष्क्रिय होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजात झुंडशाही वाढत आहे. आज समाजात स्मृतिभ्रंशाचा खेळ सुरु झाला आहे. स्मृतीचे हे होणार विस्थापन मानवजातीला कडेलोटकडे नेणारे आहे. ही गोष्ट जेंव्हा सर्वांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत हा समाज खऱ्याअर्थी जागा होणार आहे असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार कृष्णात खोत यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालयात ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम’ यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथालय व वाड्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेखक आपल्या भेटीला’ हा उपक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे उपस्थित होते. प्रारंभी भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम’ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शिवराज २०२४ या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार कृष्णात खोत यांनी विद्यार्थी व वाचकांशी आपल्या मुक्त संवादामध्ये- युद्धाला शांततेच्या मार्गाने थोपविण्यासाठी वाचन महत्वाचे आहे. वाचनातून आपण चांगले जीवन जगू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लेखकाला भोवतालचा निसर्ग व माणसं ही नेहमी प्रेरणा देत असतात. लेखकाने सत्य मांडले पाहिजे. लेखक हा वाचकांशी साहित्यातून संवाद साधत असतो. त्यामुळे लेखकाचे साहित्य हे आपलेच आहे असे वाटायला लागते तेंव्हा लेखकाच्या साहित्याशी वाचक खऱ्याअर्थी समरस झाल्याचे स्पष्ट होते. आज जगात वेगळेपण सिद्ध करण्याची गरज आहे. आपली मातृभाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. प्रत्येकांच्या जगण्याची भाषा झाली पाहिजे तरच आपल्या मातृभाषेचे महत्व समाजात अधोरेखित होईल असे प्रा.खोत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी वाचकांमधून आलेल्या प्रश्नोत्तरोत्तून मुक्त संवाद साधला. यावेळी अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी विद्यार्थ्यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके वाचली पाहिजे. त्यांचा आदर्शवत प्रवास जाणून घेतला पाहिजे. त्यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण करून आपली वाटचाल करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी वाचन चळवळीचे महत्वही विद्यार्थ्यांना सांगितले. प्राचार्य डॉ.एस.एस.कदम यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास डॉ.पट्टणशेट्टी, उपाध्यक्ष अॅड.दिग्विजय कुराडे, संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, सौ. रूपा दड्डी, सुरेश पोवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रेखा पोतदार, विशाखा जोशी, ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए.एम.हसूरे यांच्यासह अन्य मान्यवर, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.श्रद्धा पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ.अशोक मोरमारे यांनी केले तर आभार प्रा.पौर्णिमा पाटील यांनी मानले.