गडहिंग्लज : लोकशाहीच्या खऱ्या कार्यशाळा ग्रामसभा आहेत. गांधीजींनी सांगितलेली ग्रामसभेच्या माध्यमातून गावातील सामाजिक योजना राबवण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे. जोपर्यंत ग्रामस्थांचा सहभाग यामध्ये वाढत नाही. तोपर्यंत गांधींच्या स्वप्नातील खेडे सत्यात उतरणार नाही. ग्रामस्थांच्या सहभागाने गावखेड्याचा विकास केला पाहिजे. या खेड्यामध्ये लोकांच्या सहभागाने एकमेकांच्या सहकाऱ्याने गावचा विकास साधला पाहिजे. भारतीय राज्यघटना ही आपल्या जगण्याचा मार्ग आहे. ग्रामस्थांचा सहभाग वाढवून खेड्याच्या विकासाला सहकार्य केले पाहिजे तरच गांधीजींच्या स्वप्नातील खेडे सत्यात उतरेल असे प्रतिपादन डॉ. भालबा विभुते यांनी केले असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ.भालबा विभूते यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालयात महाविद्यालय, राज्यशास्त्र विभाग यांच्या वतीने आयोजित ‘महात्मा गांधींच्या स्वप्नातील खेडे’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे होते. यावेळी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष बसवराज आरबोळे, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
‘महात्मा गांधींच्या स्वप्नातील खेडे’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ.भालबा विभूते प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ते पुढे म्हणाले- महात्मा गांधीजी यांना अपेक्षित असलेले खेडे आज दुभंगलेले आहे. सध्या या खेड्यात सामाजिक हित बाजूला पडून राजकीय गट-तट आपले स्वार्थ साधत आहेत अशा अवस्थेत आपण महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील खेडे समृद्ध करण्यासाठी एकत्र राहणार आहोत की नाही ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी त्यांनी पूर्वीचे खेडे आणि आजचे खेडे यातील फरक सांगून खेड्यातील शेतकरी व कष्टकरी वर्गाचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी शासनावर दबाव आणून आपले धोरण ठरविण्यास भाग पाडले पाहिजे तरच गांधीजींचे खेडे स्वयंपूर्ण होईल असे डॉ.विभूते यांनी सांगितले.
शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी महात्मा गांधीजींच्या कार्याचे आजच्या नव्या पिढीने स्मरण करणे गरजेचे आहे. त्यांनी केलेल्या त्यागातून आपला देश खऱ्याअर्थी स्वतंत्र झाला. आजही संपूर्ण जग महात्मा गांधी यांच्या विचारांचा पाईक बनला आहे. अशा थोर विभूतींच्या कार्याचा आदर्श घेऊन सर्वांनी वाटचाल करणे आवश्यक असल्याचे सांगितले. संस्थेच उपाध्यक्ष अॅड.दिग्वीजय कुराडे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस महागांवचे सरपंच श्री प्रशांत शिंदे, हसूरवाडीच्या सरपंच कोमल कुसमुडे, इंचनाळच्या उपसरपंच कविता पाटील, प्रा.पौर्णिमा कुराडे यांच्यासह तालुक्यातील विविध गावाचे सरपंच, उपसरपंच, प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यशाळेत स्वागत पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ.ए.जी.हारदारे यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा पाटील यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा.संजय खोत, प्रा.विक्रम शिंदे, ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, प्रा.गौरव पाटील, प्रा शरद पाटील यांनी परिश्रम घेतले.