बदलापूर येथील घटनेचा ठाकरे शिवसेनेच्या वतीने गडहिंग्लजला निषेध

KolhapurLive

नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी  
गडहिंग्लज : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे आदर्श विद्यालयात दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा गडहिंग्लज येथे शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) वतीने निषेध करण्यात आला.
चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या आदी घोषणांचे फलक हाती घेत महिला, मुली व शिवसैनिकांनी सरकारचा निषेध केला. सरकार विरोधात घोषणा देत बदलापूर येथील घटनेबद्दल आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींबाबत घडलेली घटना ही फारच निंदनीय आहे. असा घृणास्पद प्रकार करणाऱ्या त्या नराधमास फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे. राज्यात सरकार महिलांचा सन्मान करत असल्याचा गवगवा करून मतांसाठी विविध योजनांची प्रलोभने दाखविली जात आहेत. तर दुसरीकडे राज्यातील महिलाच असुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नच ऐरणीवर आला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांसाठी 'लाडकी बहीण' सारख्या योजनांवर खर्च करण्यापेक्षा राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सरकारने निधी खर्च करावा असे सांगून सरकारचा त्यांनी निषेध केला. त्या शाळेचा परवाना रद्द करण्यात यावा, या प्रकरणातील नराधमाला फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत यांनीही आपल्या मनोगतातून या घटनेचा निषेध करत नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली.
यावेळी चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, गडहिंग्लज तालुका महिला संघटिका स्नेहल पाटील, शहर प्रमुख संतोष चिकोडे, सुधाकर जगताप, संदीप चव्हाण, वसंत नाईक, श्रीशैल साखरे, बाळू कुंभार, संदीप कुराडे, युवा सेना जिल्हाधिकारी अवधूत पाटील, तेजस घेवडे, प्रकाश रावळ, दिगंबर पाटील, संभाजी येडूरकर, काशिनाथ गडकरी यांच्यासह महिला, मुली व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.