क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण आज होणे काळाची गरज आहे.

KolhapurLive
राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय महामंत्री बाबा नदाफ
आपल्या देशासाठी अनेक क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानातून भारत देश खऱ्याअर्थी स्वतंत्र झाला. शहीद आणि देशभक्त क्रांतिकारकांच्या स्वप्नातला भारत देश टिकवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण आज होणे काळाची गरज आहे. इंग्रजांची जुलुमी राजवट व भांडवलशाही व्यवस्था या देशातून गेली पाहिजे हे आपल्या देशातील क्रांतिकारकांचे खरे स्वप्न होते. असे प्रतिपादन राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय महामंत्री बाबा नदाफ यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालय व संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती दिनानिमित्त आयोजित ‘स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान’ या विषयावर व्याख्यानामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य.डॉ.एस.एम.कदम होते तर शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी कुंडीतील रोपाला मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

या देशातील शेतमजूर, कामगार, कष्टकरी यांना माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे आपल्या त्यागातून हा आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे यासाठी अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध आवाज उठविला आहे. त्यांनी दिलेले बलिदान अत्यंत मोलाचे आहे. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या अनेक थोर क्रांतिकारकांचे योगदान आपण कधीच विसरू शकत नाही. खरेतर आज आपल्याला स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला नाही. आज धर्म, जात प्रिय वाटू लागली आहे. धर्माच्या आणि जातीच्या भेदातून व्देष पसरविला जात आहे. हे थोतांड आपण सर्वांनी मनातून काढून टाकूया, आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतीकारकांना आठवूया आणि देशभक्तीचा विचार जगवूया असे आवाहनची बाबा नदाफ यांनी केले. यावेळी त्यांनी देशभक्तीपर गीतांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य.डॉ.एस.एम.कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी एन.सी.सी.विभाग प्रमुख डॉ.राहुल मगदूम, प्रा.जयवंत पाटील, प्रा.संतोष पाटील, प्रा.तानाजी भांदुगरे, प्रा.स्वप्नील आर्दाळकर यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते, सूत्रसंचालन कु.गौरी भोसले यांनी केले तर कु.स्वामिनी काटकर यांनी आभार मानले.