शिवराजमध्ये ‘प्रथम पिढी उद्योजकता कार्यक्रम’ संपन्न

KolhapurLive

गडहिंग्लज : सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यासक्रम केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व येथील शिवराज महाविद्यालय वाणिज्य विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रथम पिढी उद्योजकता कार्यक्रम’ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते. या कार्यक्रमात प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डॉ.महेश चौगुले यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी मुंबई येथील टाटा इन्स्टीटयूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेच्या मनीषा तपस्वी यांनी नवे उद्योजक घडावेत, विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक घडण्याची जिज्ञासा निर्माण व्हावी. आपल्या देशातील तरुण पिढी सक्षम व्हावी यासाठी विद्यार्थ्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण होणे गरजेचे आहे. आज व्यावसायिक संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यासाठी आपल्या देशात नवे उद्योजक निर्माण होणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मनीषा तपस्वी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये स्पष्ट केले. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यासक्रम केंद्राचे सहाय्यक संचालक डॉ.अविनाश भाले म्हणाले- नवे उद्योजक घडविण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने हा उपक्रम हाती घेतला आहे. यातून नवीन उद्योजक निर्माण व्हावेत हा उदात्त हेतू स्पष्ट आहे. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक होण्याची भावना निर्माण व्हावी तसेच त्यादृष्टीने विद्यार्थ्यांची वाटचाल व्हावी यासाठी आमचा प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापन अधिष्ठाता तसेच सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यासक्रम केंद्राचे संचालक डॉ.एस.एस.महाजन यांचे विशेष प्रोत्साहन लाभले. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी आभार डॉ.बी.एम.जाधव यांनी मानले.