गडहिंग्लज : येथील संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सच्या नवागत विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसनराव कुराडे लिखित ‘चिंगीचा माइंडसेट’, ‘भृणकन्येचा आत्मध्वनी’, ‘आई दार उघड’ यांसह अन्य नामवंत लेखकांचे ग्रंथ विद्यार्थ्यांना भेट देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले.
प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडविण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण घेणे गरजेचे आहे. आपल्या करिअरला घडविण्याची खरी संधी आताच आहे. शिवाय आपण गुरुजनांच्या सानिध्यात राहून ज्ञान मिळविले पाहिजे. शिवराज विद्या संकुलामार्फत बहुजनांच्या मुलांना शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करून सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. संस्थेच्या संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांनी शिवराज विद्या संकुलामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक ज्ञानाबरोबरच कौशल्यज्ञान देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी याचा आवश्यक लाभ घेऊन आपले करिअर समृद्ध करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.
ग्रंथपाल श्री संदीप कुराडे यांनी आज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन चळवळ रुजावी तसेच वाचनाबाबत अभिरुची निर्माण व्हावी यासाठी आज महाविद्यालयाने ग्रंथ भेट देऊन सर्वांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील ग्रंथांचा लाभ घ्यावा तसेच पुस्तकांच्या सानिध्यात राहून आपले करिअरला बळकट करावे असे त्यांनी सांगितले. याचबरोबर डॉ.महेश चौगुले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संयोजन आर्ट्स व कॉमर्स विभागाचे प्रा.सुजाता जांगनुरे, प्रा.प्रियांका जाधव, प्रा.गीतादेवी देसाई, प्रा.एस.ए.साखरे, प्रा.तानाजी भांदुगरे, प्रा.संजय कांबळे, प्रा.संतोष पाटील, सायन्स विभागाचे प्रा.स्मिता पाटील, प्रा.संजना पाटील, प्रा.रोशन पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक यांनी केले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.आशा पाटील यांनी मानले. आभार प्रा.जयवंत पाटील यांनी मानले.