भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास अखेर संपताना दिसतोय. लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषद किंवा राज्यसभेत घ्यावं, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जात होती. अखेर पंकजा मुंडे यांची ही मागणी भाजपने मान्य केली आहे. पंकजा मुंडे यांचा गेल्या 5 वर्षांपासून राजकीय वनवास सुरु होता. पंकजा यांनी वारंवार आपली नाराजी व्यक्त देखील करुन दाखवली होती. पण लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजप पक्षाकडून खासदारकीचं तिकीट देण्यात आलं. या माध्यमातून भाजप पंकजा यांना देशाच्या राजकारणात सक्रीय करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत होती. पण लोकसभेत निवडणुकीत त्यांना भाजप पक्षाकडून खासदारकीचं तिकीट देण्यात आलं. या माध्यमातून भाजप पंकजा यांना देशाच्या राजकारणात सक्रीय करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत होती. पण लोकसभेत पराभव झाल्याने पंकजा यांचं काय होणार? याबाबत चर्चा सुरु होत्या. राज्यात दुसरीकडे ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा मोठा फटका महायुतीला लोकसभेत बसला. अशा परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळावा या हेतूने भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय. या निमित्ताने पंकजा मुंडे यांचं राज्याच्या राजकारणात पुनर्वसन होत आहे.
भाजप एकीकडे पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय करत आहे. पण दुसरीकडे भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचं काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. विशेष म्हणजे रासप नेते महादेव जानकर यांच्याबद्दलही तसाच प्रश्न उपस्थित होतोय. महादेव जानकर यांच्यासाठी महायुतीने लोकसभेच्यावेळी परभणीची जागा दिली होती. पण यावेळी भाजपने महादेव जानकर यांना संधी दिलेली नाही. विशेष म्हणजे भाजपने आपल्याला एक राज्यसभा आणि विधान परिषदेची जागा देण्याचं कबूल केलं होतं, असा दावा महादेव जानकर यांनी नुकताच केला होता. पण विधान परिषदेच्या 5 जागांपैकी एकाही जागेवर महादेव जानकर यांना पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता महादेव जानकर हे महायुतीपासून लांब जात आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
भाजपने विधान परिषदेसाठी 5 नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये पंकजा मुंडे यांचं पहिलं नाव आहे. यानंतर योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोखले यांची नावे आहेत. या यादीत पाचवं नाव हे महायुतीचे घटक पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांचं आहे. भाजपकडे विधान परिषदेत 5 आमदार निवडून येतील इतकं संख्याबळ आहे. महादेव जानकर यांची जागा सदाभाऊ खोत यांना देण्यात आली आहे. सदाभाऊ खोत एक शेतकरी चेहरा आहे. तसेच महायुतीला त्यांचा फायदा व्हावा, या विचारातून त्यांना विधान परिषदेवर घेण्यात येत आहे.