शिवराज महाविद्यालयाच्यावतीने शहीद जवान अशोक बिरंजे स्मृती ज्योत दौड संपन्न

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाच्या एन.सी.सी.विभागाच्यावतीने आयोजित शहीद जवान अशोक बिरंजे यांच्या रौप्य महोत्सवी स्मृतीदिनानिमित्त स्मृती ज्योत दौड संपन्न झाली. प्रारंभी महाविद्यालयात शहीद जवान अशोक बिरंजे यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांच्या हस्ते करण्यात आले. शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांच्या हस्ते स्मृती ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. माजी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय धावपटू श्री परशुराम भोई यांच्याकडे स्मृती ज्योत सुपूर्द करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातून स्मृती ज्योत दौडला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी दौड करीत सदरची स्मृतीज्योत ‘अमर रहे, अमर रहे, शहीद जवान अशोक बिरंजे अमर रहे’, ‘भारत माता की जय’ च्या घोषणांच्या निनादामध्ये वैरागवाडी येथील शहीद जवान अशोक बिरंजे स्मृतीस्थळाजवळ मिरवणूकीने दाखल झाले. दरम्यान या स्मृती ज्योतीचे स्वागत ग्रामस्थांनी केले. यावेळी वीरमाता लक्ष्मीबाई बिरंजे, वीरपिता बाबुराव बिरंजे, वीरपत्नी सविता बिरंजे, सुरेश बिरंजे, सरपंच श्री पी.के.पाटील, आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, सैनिक बांधव, बिरंजे कुटुंबीय व ग्रामस्थ व विद्या मंदिर शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. एन.सी.सी.विभाग प्रमुख डॉ.राहुल मगदूम, क्रीडा शिक्षक प्रा.जयवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या दौडीमध्ये एन.सी.सी.कॅडेट व खेळाडू सहभागी झाले होते.