जय महाराष्ट्र, जय शिवराय”, राष्ट्रवादीच्या खासदाराने घेतली मराठीतून शपथ

KolhapurLive

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएने (राष्ट्रीय लोकशाही आघाडीने) देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं असून १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून (२४ जून) सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व नवनिर्वाचित खासदारांना खासदारकीची शपथ देण्यात आली. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे. कालचा दिवस विरोधी पक्षांच्या खासदारांनी गाजवला. अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेर एकत्र जमून देशातील जनतेला संविधानाच्या रक्षणाचं आश्वासन देत घोषणा दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारकीची शपथ घेत असताना काँग्रेस खासदार राहुल गाधी यांनी मोदी यांना संविधानाची प्रत दाखवून संविधान रक्षणाची आठवण करून दिली. दरम्यान, आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात काय घडतंय याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपा खासदार भर्तृहरी महताब यांची घटनेच्या कलम ९५ (१) अन्वये लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. हंगामी अध्यक्षाची काही महत्त्वाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी निवड केली जाते.

संसदेत खासदारांचे शपथविधी चालू असून आज महाराष्ट्रातील खासदार शपथ घेऊ लागले आहेत. दरम्यान, रायगडचे खासदार सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अजित पवार गट) यांनी मराठीतून शपथ घेतली. तसेच शपथविधीनंतर जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शिवराय अशी घोषणा दिली.