गडहिंग्लज : शिक्षणाशिवाय तत्कालीन समाजाचा उद्धार होणार नाही. यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानाध्ये शिक्षणाची गंगा खेडोपाडी नेण्यासाठी प्रयत्न केले याच त्यांच्या दूरदृष्टीतून प्रेरणा घेऊन ‘शिवराज’ची स्थापना झाली आहे असे प्रतिपादन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी केले.
येथील शिवराज विद्या संकुलात शिवराज महाविद्यालयाच्या हीरकमहोत्सवी वर्धापन दिन’ व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंतीनिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम कदम होते. प्रारंभी स्वागत पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.किसनराव कुराडे पुढे म्हणाले- शिवराज महाविद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारी संस्था आहे. या संस्थेने स्थापना शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई, खासदार व्ही.टी.पाटील, डॉ.घाळी साहेब या कर्मयोगींनी केलेली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेबरोबर सुरु झालेल्या पहिल्या पाच महाविद्यालयांमध्ये शिवराज महाविद्यालयाचा समावेश आहे. याचे आपण सर्व साक्षीदार हे खऱ्याअर्थी भाग्यवंत आहेत. आज याच महाविद्यालयाचा साठावा वर्धापन दिन व शाहू महाराज यांची १५० वी जयंती हा ऐतिहासिक योगायोग म्हणावा लागेल. आजही हे महाविद्यालय आपल्या परीने बहुमोल असे योगदान देत आहे. या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी अनेकांनी केलेला त्याग हा कधीच विसरता येणार नाही. या संस्थेने राजर्षी शाहू महाराज व कर्मवीर विठठल रामजी शिंदे यांच्या कार्याचा वारसा आजही जपला आहे. गोरगरीब समाजासाठी त्यांनी पेरलेला सामाजीक विचार घेऊन आमच्या संस्थेची वाटचाल सुरु आहे. असेही शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी केले.यावेळी यावेळी महाविद्यालयाचे कर्तृत्ववान माजी विद्यार्थी जनता सहकारी बँकेचे माजी सरव्यवस्थापक श्री के.जी.पटेकर (आजरा), शिक्षक के.आय.रोकडे (ऐनापूर), माजी मुख्याध्यापक श्री शैलेश पाटील (अत्याळ), माजी पोलीस पाटील शिवाजीराव निळकंठ पाटील (कडगाव) यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कारमूर्ती माजी विद्यार्थी श्री के.जी.पटेकर, के.आय.रोकडे, श्री शैलेश पाटील यांनी आपल्या भाषणातून शिवराज महाविद्यालय त्याकाळी खडतर परिस्थितीतून शिकणाऱ्या आम्हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे होते. शिवराजमुळे आम्ही खऱ्याअर्थी घडलो आहोत. आजही हे महाविद्यालय समाजातील ग्रामीण विद्यार्थ्यांचा आधार बनला आहे. या महाविद्यालयाने घेतलेली झेप ही खरोखरच आजही प्रेरणादायी आहे असे स्पष्ट करून आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ६० वर्षापूर्वी सुरु झालेल्या या शिवराज महाविद्यालयाने हजारो विद्यार्थी घडविले आहेत. या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या योगदानाचे सिंहावलोकन करताना- संस्थेच्या माध्यमातून बहुजनांची मुले शिकावीत या उद्देशाने हे महाविद्यालय स्थापन करण्यात आले आहे. यासाठी अनेकांनी आप-आपल्या परीने योगदान दिले आहे. समाजाची गरज ओळखून विविध अभ्यासक्रमाची सोय करण्यात येत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अग्रेसर असे शिवराज महाविद्यालय आपल्या कार्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आजही योगदान देत आहे अनेक विद्यार्थी घडवीत आहेत याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी या भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जानातून ऑक्सिजन देण्याचे कार्य करीत आहे. या भागातील विद्यार्थी घडावेत यासाठी आमचे आजही महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. यावेळी सहसचिव श्री एम.के.सुतार, संचालक श्री बसवराज आजरी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष श्री के.जी.पाटील, अॅड. दिग्विजय कुराडे, श्री के.बी.पेडणेकर, संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांच्यासह संस्थेचे अन्य पदाधिकारी, विद्या संकुलातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अशोक मोरमारे यांनी केले तर आभार शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांनी मानले.