जेवढी प्रतिकूल परिस्थिती तेवढ्याच त्वेषाने संघर्ष करत लढणं ही अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाची ओळख. टी२० वर्ल्डकपच्या सेमी फायनल प्रवेशासाठी मंगळवारी अफगाणिस्तानला विजय अत्यावश्यक होता. पाऊस आणि गणितीय समीकरणं यांना बाजूला सारत अफगाणिस्तानने खणखणीत खेळाच्या जोरावर बांगलादेशला नमवलं आणि टी२० वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली. विजयानंतरचा जल्लोष, चाहत्यांच्या डोळ्यात तरळलेले आनंदाश्रू, सपोर्ट स्टाफने दुखापतग्रस्त रहमनुल्ला गुरबाझला खांद्यावर उचलून त्याला मैदानाची सैर घडवणं चिरंतन काळ क्रिकेटचाहत्यांच्या स्मरणात राहील. अफगाणिस्तानचा हा प्रवास फक्त क्रिकेटपुरता नाहीये. आर्थिक, सामाजिक, भौगोलिक अडथळे पार करत प्रस्थापितांना धक्का देण्याची मोहीम आहे. काम बोलायला हवं ही उक्ती अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी खरी करून दाखवली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर अफगाणिस्तानने दमदार कामगिरी करत इतिहास घडवला. रेफ्युजी कॅम्प, युद्धाचं सावट, तालिबानची राजवट, अन्य देशात खेळावं लागणं, भूकंपाची बातमी अशा असंख्य आव्हानांना सामोरं जात अफगाणिस्तानचा संघ नेहमीच झुंजार कामगिरी करतो. मंगळवारचा दिवस त्याला अपवाद नव्हता
१८३९ मध्ये ब्रिटिशांनी अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट खेळल्याची नोंद आहे. पण बाकी वसाहती देशांमध्ये क्रिकेट फोफावलं तसं अफगाणिस्तानमध्ये झालं नाही. आशिया खंडात भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोक्याच्या जागी अफगाणिस्तान वसलं आहे. अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांच्या भांडणात अफगाणिस्तानचा बळी गेला असं म्हटल्यास वावगं ठरू नये. रशियाने १९७९ मध्ये अफगाणिस्तानवर कब्जा करायचा प्रयत्न केला. अफगाणिस्तानने संघर्ष केला. दहा वर्ष लढत द्यावी लागली. अफगाणिस्तानमधल्या टोळ्यांना अमेरिकेने मदत केली. कोंडी असह्य झाल्यावर रशियाने अफगाणिस्तातून माघार घेतली. रशिया मागे हटल्यावर अमेरिकाचं अफगाणिस्तानमधलं स्वारस्य संपलं.
दोन महासत्ता बाजूला झाल्या आणि अफगाणिस्तानमध्ये कट्टरतावाद्यांनी ताबा मिळवला. नव्वदीच्या दशकात अफगाणिस्तानवर तालिबानचा अंकुश होता. १९९६ ते २००१ एवढा काळ तालिबानने राज्य केलं. सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेत ट्वीन टॉवर्सवर दहशतवादी हल्ल्यानंतर चित्र बदललं. अमेरिकेच्या लष्कराने तालिबानी राजवट उलथावून लावली. २०१४ मध्ये अमेरिकेच्या लष्कराने अफगाणिस्तान सोडलं.