गडहिंग्लज : येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण प्रसंगी शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी या जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगून वृक्ष लागवड का करावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण सारखे उपक्रम आपण महाविद्यालय परिसरात राबवत आहात. खरोखरच हा उपक्रम कौतुकास्पद आहे. असा उपक्रम दरवर्षी राबवला पाहिजे तसेच वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली पाहिजेत आणि त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. तरच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास खऱ्याअर्थी थांबणार आहे. तरी सर्वांनी वृक्षारोपणाची ही मोहीम गांभीर्याने राबविणे गरजेचे आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे. झाडांच्या माध्यमातून आपण अनेक लाभ घेतो. अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती या आपल्या प्रत्येकाला उपयोगी पडतात असे त्यांनी प्रतिपादन केले. एन.एस.एस. चे कार्यक्रम अधिकारी प्रा. सोहेल राऊत यांनी व एन.एस.एस.च्या स्वयंसेवक-स्वयंसेविकांनी महाविद्यालय परिसरात औषधी गुणांनी युक्त अशी रोपे लावली. या वृक्षारोपण कार्यक्रमास फार्मसीचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.