गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे उद्या (ता. ६) पासून डेव्हलपमेंन्ट फुटबॉल लीग स्पर्धेला प्रारंभ होत आहे. अकरा जून अखेर हि स्पर्धा आहे. रोज सायंकाळच्या सत्रात दोन सामने होणार आहेत. स्पर्धेत सहा संघाचा सहभाग आहे. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर होणाऱ्या शिवराज युनायटेड ट्रॉफीसाठी रोख पन्नास हजारांची बक्षिसे आहेत. स्पर्धेचे यंदाचे अकरावे वर्ष आहे
कुमार आणि युवा खेळाडूंना अधिक सामने खेळण्याचा अनुभव मिळावा हाच या स्पर्धेचा उद्देश आहे. पंधरा, अठऱा आणि एकोणीस, एकवीस वर्षाखालील खेळाडूंचा समावेश संघात आहे. गेले दहा दिवस निवडलेल्या खेळाडूंचे सराव शिबिर झाले. रंगतदार बोलीव्दारे या खेळाडूंची श्रेयस -अर्थव वॉरियर्स, गुफा गार्डीयन्स, संघर्ष फायटर्स, दादा जीएम चँलेजर्स, इफा लायन्स, युनायटेड रायझिंग स्टार्स अशा सहा संघात विभागणी करण्यात आली आहे. सर्व खेळाडूंना संघाचे किट देण्यात आले आहे.
सायंकाळी साडे चार वाजता शिवराज शिक्षण संकुलाचे विश्वस्त दीग्विजय कुराडे यांच्या हस्ते स्पर्धेला प्रारंभ होईल. जेष्ट खेळाडू डॉ सुरेश संकेश्र्वरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी तानाजी देवार्डे, सिंकदर यळकुद्रे, गुंडू पाटील, अलीखान पठाण, गौस मकानदार, नंदू पाटील उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक सामन्यातील विजयी संघातील खेळाडूस सामनावीर तर पराभुत संघातील खेळाडूस लढवय्या म्हणून क्रीडासाहित्य देऊन गौरव होईल. फुटबॉल शौकीनांनी उपस्थित राहून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जून बेल्लद, उपाध्यक्ष डॉ रविंद्र हत्तरकी, शिवराजचे सचिव डॉ अनिल कुराडे यांनी केले आहे. स्पर्धेची पुर्ण तयारी झाली असल्याचे समन्वयक रोहित साळुंखे, अनिकेत कोले यांनी सांगितले.