गडहिंग्लज, दि. ५: कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातून एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेतल्यास प्रा. संजय मंडलिक यांना कुणीच पराभूत करू शकत नाही हा विश्वास मनी बाळगा. या विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य हेच प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयाचे लीड ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात प्रमुख नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत पालकमंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
मंत्री श्री. मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले, गडहिंग्लज हे वैचारिक बैठक असलेले शहर आहे. प्रा. संजय मंडलिक यांच्या मोठ्या मताधिक्याच्या विजयासाठी एक एक मताची शिकस्त करा. दिवंगत खासदार स्वर्गीय कै. सदाशिवराव मंडलिक यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघेही या राजकारणात समाजकारणात एकत्र घडलो आणि वाढलोही. त्यामुळे ते माझे गुरुबंधू आहेत. काही वेळा मतभेदही झाले. परंतु; ते आता सगळं गंगेला मिळालं. मागचं सगळं विसरून एकदिलाने कामाला लागूया आणि त्यांना पुन्हा खासदार करूया. ते पुढे म्हणाले, लोकसभेची ही निवडणूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणारी आहे. त्यासाठी संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्याने खासदार करा. या निवडणुकीत तीन गोष्टी कटाक्षाने पाळा असे सांगतानाच ते म्हणाले, येत्या विधानसभेला तुम्ही काय करणार, असा प्रश्न प्रा. मंडलिक यांना विचारून त्यांची अडचण करू नका. आपण आजवर जनतेची सेवाच केलेली आहे. परमेश्वर आणि जनता आपल्या पाठीशी आहे. कोणतेही नकारात्मक मुद्दे उकरून काढून त्याची चर्चा करत बसू नका. तसेच; भाजपासह राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट आणि मित्रपक्ष मिळून एकदिलाने काम करूया. महायुतीतील घटक पक्षापैकी कोणीही नाराज होऊन त्याचा दुष्परिणाम प्रा. मंडलिक यांच्या मताधिक्यावर होईल, असे वर्तन आणि वक्तव्य करू नका.
संकल्प विजयाचा.......!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, १७ एप्रिल रोजी प्रभू श्री. रामनवमी येत आहे. त्याच दिवशी माझा तिथीनुसार वाढदिवस आहे. आई जगदंबेच्या कृपेने माझा जन्म प्रभू श्री. रामनवमी दिवशीच झाला आहे, याबाबतचे संशोधन आता सिद्ध झाले आहे. दरम्यान; या निवडणुकीत ८५ वर्षावरील वयोवृद्ध नागरिकांना आणि दिव्यांग नागरिकांना घरातून मतदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त त्यादिवशी अशा मतदारांच्या घरी जाऊन प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयाचा संकल्प त्यांना सांगा.
यावेळी किरणराव कदम, वसंतराव यमगेकर, उदय जोशी, सिद्धार्थ बन्ने, बसवराज खनगावे, बाळासाहेब घुगरी, नरेंद्र भद्रापुरे, गुंडेराव पाटील, उदय परीट, मंजुषा कदम, सुरेश कोळकी, अरुणा शिंदे, रेशमा कांबळे, अशपाक मकानदार, हरून सय्यद, महेश सलवादे, अरुण बेल्लद, महेश शिंदे, रश्मीराज देसाई, महेश गाढवी, अरुणा कोलते, राजू जमादार, रफिक पटेल आदी प्रमुख उपस्थित होते.
................
गडहिंग्लज: येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात प्रमुख नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे प्रमुख पदाधिकारी.
===============