गडहिंग्लज : विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले करिअर घडविणे गरजेचे आहे. विद्यार्थी दशेत शिक्षण घेत असताना आपण भविष्यात काय करणार आहोत हे निश्चित करूनच विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे गरजेचे आहे. या ध्येयाच्या पुरतेसाठी आपण कठोर परिश्रम घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे प्रमुख आय.पी.एस.प्रशिक्षणार्थी अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालयात ज्युनिअर विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते तर पी.एस.आय. श्री घाटगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक शिवराज विद्या संकुलाच्या संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. महेश चौगुले यांनी करून दिला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आय.पी.एस.प्रशिक्षणार्थी अधिकारी हर्षवर्धन बी.जे. पुढे म्हणाले- आपले स्वप्न सत्यात उतरण्यासाठी विद्यार्थ्यांनी रोज सातत्याने अभ्यास केले पाहिजे तरच आपल्या कष्टाला न्याय मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली संगत चांगल्याशी ठेवली पाहिजे. असे स्पष्ट करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले करिअर कसे घडवू शकता तसेच आय.पी.एस.परीक्षा प्रक्रिया काय आहे तसेच मुलाखत कशी होते याबाबतही विद्यार्थ्यांना त्यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. यावेळी ज्युनिअर विभागाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी आभार मानले.