चंदगड : फाटकवाडी मध्यम प्रकल्पाच्या विविध प्रलंबीत कामांच्या पूर्ततेसाठी आणि देखभाल दुरुस्तीसाठी २४ कोटी रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी दिली.
२०१९ च्या अतिवृष्टीमुळे फाटकवाडी प्रकल्पातील सांडव्याजवळील रिटेनिंग वॉल पडला होता. त्यामुळे धरणाला धोका पोहोचण्याची परिस्थिती उदूभवली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन गेली चार वर्ष. 'चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा पाटबंधारे विभागाचे मंत्री तसेच महाराष्ट्र शासनाकडे केला होता. त्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाला प्रस्ताव तयार करुन महाराष्ट्र शासनाने फाटकवाडी प्रकल्पाच्या सांडवा ऊर्जाशमन भागातील उजव्या तीरावर मार्गदर्शक भिंत बांधणे, वाढीव एनओएफ भिंत बांधकाम, भरावकाम व सांडव्याच्या पलिकडील ढासळणाऱ्या टेकडीस उपाय योजना करणे, या कामाकरिता २४ कोटींच्या निधीला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आपल्याला सहकार्य लाभल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.