अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीचा इको फ्रेंडली गणेशोत्सव उत्साहात साजरा

KolhapurLive

गडहिंग्लज : मुगळी येथे अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी आणि एटी फाऊंडेशनने प्रथमच गणेशोत्सव साजरा केला. पाच दिवस पार पडलेल्या या उत्सवात अकॅडमीच्या खेळाडूंनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

विशेष म्हणजे स्थापित केलेली गणेशमूर्ती ही खेळाडूंनी एकत्रित येऊन स्वतः मातीने बनवली होती. खेळाडूंनी छोटा गाडा सजवून गणेशाची संपूर्ण गावातून जल्लोषात मिरवणूक काढली आणि मूर्ती स्थापित केली. पाच दिवस खेळाडू एकत्रित येऊन आरती करत होते तसेच विविध खेळ देखील त्यांना खेळविण्यात आले. गणेश विसर्जन करताना देखील पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घेण्यात आली.

अकॅडमी आणि फाऊंडेशन च्या संस्थापिका अंजू तुरंबेकर यांनी खेळाडूंमध्ये एकोप्याची भावना, सामाजिक बांधिलकी आणि सर्जनशीलता निर्माण करणे आणि जपणे हे या उत्सवाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले. मुगळी गावाचे सरपंच श्री. आरबोळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि असे उत्सव आणि कार्यक्रम सतत गावामध्ये चालू ठेवण्याची त्यांनी ईच्छा व्यक्त केली. अकॅडमीच्या मुख्य प्रशिक्षिका भक्ती पवार, प्रशिक्षक आकाश देसाई, फाऊंडेशनचे स्वयंसेवक आकांक्षा माळगी, मयुरी अर्जुनवाडे आणि वैभव सुतार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.