‘हा बिनअकलेचा पेंद्या, मनोहर भिडया’, संभाजी भिडेंवर टीका करताना काँग्रेस नेत्याचाही तोल सुटला

KolhapurLive


मुंबई : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संभाजी भिडे यांच्याविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेसने भिडे यांच्या विरोधात राज्यभर जोरदार आंदोलन केलं आहे. कुठे भिडे यांच्या फोटोला चपला मारल्या, तर कुठे रास्ता रोको करून रोष व्यक्त केला.

संपूर्ण महाराष्ट्रातच हे चित्र दिसत आहे. भिडे यांना तात्काळ अटक करण्याची मागणीही यावेळी करण्यात येत आहे. दरम्यान आता काँग्रेसच्या दोन आमदारांनी संभाजी भिडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. काँग्रेस आमदार विजय वेडट्टीवर यांचा संभाजी भिडेंबद्दल बोलताना तोल सुटला.

संभाजी भिडेंना महाराष्ट्रातून नाही, तर देशातून ह्द्दपार केलं पाहिजे. ‘भिडेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना महाराष्ट्रातून नाही, तर या देशातून तडीपार केलं पाहिजे. तुमची यंत्रणा सक्रीय केली पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ कसे नाही सापडतं. तुमचे लागेबंधे आहेत का? म्हणून तुम्ही बेजबाबदारपणे वागता का? राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. तुम्ही भांग पिऊन येता का? हे सहन केलं जाणार नाही” असा इशारा आमदार यशोमती ठाकूर यांनी दिला.

‘विष पेरण्याच काम हा संभाजी भिडे करतोय’

“त्यांचं नाव संभाजी नाहीय, हे टोपण नाव आहे. मनोहर भिडे नाव आहे. मराठा आणि बहुजन समाजाच्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली विष पेरण्याच काम हा संभाजी भिडे करतोय” असा आरोप काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला.