गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाचा खेळाडू संदेश कुरळे यांची चायना येथे वर्ल्ड युनिव्हर्सिटी लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल या खेळाडूचा सत्कार प्राचार्य डॉ. एम. एम. कदम यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख डॉ. राहुल मगदूम यांनी केले.
या सत्कार समारंभात शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून -संदेश कुरळे या खेळाडूला कष्ट व मेहनत घेत असताना मी जवळून पहिले आहे. मोठ्या जिद्दीने सततचा सराव सुरु ठेऊन खेळातून स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याची आजही धडपड चालू आहे. त्याच्या या जिद्दीला वडिलांचीही खंबीर साथ नेहमी मिळत आहे असे स्पष्ट करून संदेशच्या या दैदिप्यमान यशाचे कौतुक केले तसेच त्यांनी संदेशला शिवराज महाविद्यालयाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. संदेशची धडपड आणि खेळातील सातत्य त्याच्या जगण्याला उभारी देत आहे. असेच यश चायना येथे होणाऱ्या इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत मिळावे याचा आम्ही मोठ्याने गौरव करणार असल्याचेही स्पष्ट करून संदेश कुरळेला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डी. एस. एम. कदम यांनी संदेश कुरळे याने आपल्या खेळातून दाखविलेली चमक खरोखरच यशाला गवसणी घालणारी आहे. संदेश लॉन टेनिस खेळातून शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत आहे. हे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. एस. जी. मुंज, प्रा. सौ बिनादेवी कुराडे, डॉ. महेश चौगुले यांनीही संदेशला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास केमिस्ट्री विभाग प्रमुख डॉ. ए. एम. हमुरे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, नकचे समन्वयक प्रा. किशोर अदाटे यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक मोरमारे यांनी केले. प्रा. जयवंत पाटील आभार मानले