गडहिंग्लज : भारत सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय परिषद, उच्च शिक्षण विभाग व शिक्षा मंत्रालय यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण शाश्वत विकास संस्थेकडून शिवराज महाविद्यालयास तीन विभागात 'ए प्लस' (A+) ग्रेड मानांकन मिळाले आहे. यामध्ये 'ग्रीन कैंपस', 'सरफेस वॉटर हार्वेस्टिंग', सोलर सिस्टीम' साठी 'ए प्लस' (A+) ग्रेड मिळाली आहे आणि 'वेस्ट मैनेजमेंट' व 'रुफटॉप वॉटर हार्वेस्टिंग या दोन विभागासाठीही 'ए' (A) ग्रेड प्राप्त झाली आहे.
सदर मुल्यांकन प्रक्रिया जानेवारी २०२२ ते मार्च २०२३ मध्ये करण्यात आली असून यामध्ये शिवराज महाविद्यालयाकडून सहभाग नोंदवून विद्यार्थ्याचे पाच सेल्फ हेल्प ग्रुप्स (S.S.HA.G.) तयार करण्यात आले होते. या ग्रुपच्या माध्यमातून पाणी, पर्यावरण, प्लास्टिकमुक्ती, वृक्षारोपण, ग्रामीण मुलांचे शिक्षण, आरोग्य, महिलांचे आरोग्य आणि वाडी-वस्त्यांची स्वच्छता हे विविध उपक्रम राबविले आहेत. असे उपक्रम राबवून महाविद्यालयाच्या सेल्फ हेल्प ग्रुपने कॉलेज कैंपस व गडहिम्लन परिसरामध्ये पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण यामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यामुळेच या महाविद्यालयास 'ए प्लस' (A+) ग्रेड मानांकन मिळाले आहे. यापूर्वी महाविद्यालयाला गेल्या महिन्यात नॅक कमिटीनेही 'ए' मानांकन बहाल केलेले आहे. एका महिन्यातच केंद्रीय व राज्य पातळीवरील तपासणी पथकाकडून गौरवास्पद मानांकने मिळविणारे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हे पहिलेच कॉलेज ठरलेले आहे. त्यामुळे या विद्या संकुलाचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. महाविद्यालयाची सर्वांगीण वाढ आणि ग्रामीण शिक्षणाची गरज लक्षात घेऊन या वर्षापासून तब्बल ११ नवीन तुकड्यांना महाराष्ट्र शासनाने खास बाब म्हणून परवानगी दिलेली आहे. याचा अर्थ आणखी तीन वर्षांनी तुकड्यांची संख्या ३३ वर पोहोचणार अआहे. त्यामुळे सद्या सव्वाशेहून अधिक असलेलेर वर्ग दीडशेहून जास्त होणार आहेत.
सदर उपक्रमामध्ये पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज, डॉ. रंगराव शेंडगे, डॉ. राहुल मगदूम, डॉ. श्रद्धा पाटील, प्रा. पौर्णिमा कुराडे, यांनी पाच सेल्फ हेल्प ग्रुपच्या समन्वयकाची महत्वाची भूमिका पार पाडली, या उपक्रमाचे डॉ. आण्णासाहेब हारदारे व ग्रंथपाल श्री संदीप कुराडे यांनी समन्वयक म्हणून काम पहिले. या उपक्रमासाठी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष अँड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, फार्मसीचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव, 'नॅक' विभागाचे समन्वयक प्रा. किशोर अदाटे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, शिवराज इंग्लिश मेडीयमच्या प्राचार्या सी. गौरी शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.