शिवराज महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्धापन दिनास प्रारंभ

KolhapurLive

गडहिंग्लज :

येथील शिवराज महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती व महाविद्यालयाच्या हारक महोत्सवी वर्धापन दिनाचा प्रारंभ उत्साहात करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी स्वागत करून प्रास्ताविकात महाविद्यायालयाच्या विविध उपक्रमाचा आढावा घेतला. या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज व कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शिवराज महाविद्यालयाच्या माध्यमातून तीन पिढ्या एकत्र आलेले आहेत. गेली साठ वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे शिवराज महाविद्यालय ज्यांनी निर्माण केले त्यांचे स्मरण होणे गरजेचे आहे. खासदार व्ही. टी. पाटील, बाळासाहेब माने व माजी आमदार डी. घाळी साहेब यांनी सुरु केलेले हे ज्ञानयज्ञ आजही नव्या जोमाने समाज व विद्यार्थी हिताचे कार्य करीत आहे. एवढेच नव्हे हे महाविद्यालय काळाची गरज ओळखून नव्या पिढीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी 'स्वायत्त विद्यापीठ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजाला शहाणे करण्याचे साधन म्हणून शिवराज महाविद्यालय अधिक गतिमान करण्यासाठी तसेच शिवराजच्या माध्यमातून समाजहित व विद्यार्थी हिताचे उपक्रम राबविण्यासाठी सर्वांना सामावून घेऊन महाविद्यालयाचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करणार असल्याचे प्रा.कुराडे यांनी स्पष्ट केले, त्यासाठी महाविद्यालयाच्या कार्याचा विस्तार वाढवून समाजातील अधिका- अधिक मुले शिकावीत व त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे संस्थाध्यक्ष प्रा. कुराडे यांनी सांगितले.

सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी आपल्या मनोगतामध्ये शिवराज हे महाविद्यालय हे यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहे. शिवराजच्या जडणघडणीमध्ये माझ्या कुटुंबीयांनी देखील आपल्या परीने योगदान दिले आहे याचा मी साक्षीदार आहे याचा मला अभिमान असल्याचे स्पष्ट करून महाविद्यालयाच्या हीरक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात आहे. सदर उपक्रमास आर्थिक मदत म्हणून आपला एक पगार माजी विद्यार्थी संघटनेला देऊ केला. समाजहिताचे उपक्रम राबवून समाजाशी बांधिलकी जोपासण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर श्री विश्वास देसाई, बसवराज आजरी, के. बी. केसरकर आदिनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष श्री. के. जी. पाटील, अँड. दिग्विजय कुराडे, के. बी. पेडणेकर, राजेंद्र मांडेकर, श्री प्रकाश तेलवेकर, श्री श्रीरंग चौगुले, श्री नंदनवाडे गुरुजी, माजी प्राचार्य डॉ. एस. वाय. कोतमिरे, डॉ. आर. बी. तेली, माजी रजिस्ट्रार श्री बी. एस. मोहिते, फिजिक्सचे माजी विभाग प्रमुख डॉ. एम. पी. पाटील, प्रा.बी.एम. कुलकर्णी, रेखा पोतदार यांच्यासह अन्य मान्यवर, आजी-माजी प्राध्यापक, आजी-माजी सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशा पाटील यांनी केले. आभार पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी मानले..