गडहिंग्लज तिहेरी आत्महत्या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा करा.- सर्वपक्षीय शिष्टमंडळाची पालकमंत्र्यांकडे मागणी

KolhapurLive

         
कोल्हापूर, दि. २६.गडहिंग्लज शहरातील युवा उद्योजक संतोष शिंदेसह त्यांच्या पत्नी सौ. तेजस्विनी व मुलगा कु. अर्जुन अशा तिघांनी 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या तिहेरी आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांच्या समवेत गडहिंग्लजच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. कोल्हापुरातील कसबा बावडा येथे शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री श्री. केसरकर यांची भेट घेऊन गडहिंग्लजकरांनी ही मागणी केली.
             
यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार श्रीमती जयश्रीताई जाधव, आमदार ऋतुराज पाटील ही नेतेमंडळीही उपस्थित होती.            

शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लजमधीलच शुभदा राहुल पाटील व तिचा तथाकथीत पती, निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल राऊत रा. निलजी ता. गडहिंग्लज यांनी या कुटुंबाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले आहे. हे जोडपे युवकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून कुटुंबे उध्वस्त करीत आहे.
         
शिष्टमंडळाशी बोलताना पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, या गुन्ह्यातील संशयित आरोपी असलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल राऊत यांच्या बडतर्फीसाठी आजच मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना शिफारस करू. दोशींवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल. शिंदे कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी सरकार पक्षाच्यावतीने निष्णात कायदेतज्ञ वकीलही देऊ.
           
यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरणअण्णा कदम, माजी उपनगराध्यक्ष महेश उर्फ बंटी कोरी, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिदार्थ बन्ने, माजी नगराध्यक्ष वसंतराव यमगेकर, महेश सलवादे, गुंडू पाटील, युवा सेना जिल्हाध्यक्ष प्रतीक क्षीरसागर, राष्ट्रीय कॉग्रेस शहर अध्यक्ष बसवराज आजरी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, शिवसेना शिंदे गट तालुकाध्यक्ष संजय संकपाळ आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  कोल्हापूर: कसबा बावडा येथे शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री दीपक केसरकर यांची गडहिंग्लज येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेऊन तिहेरी आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
=================