वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर गेल्या आठवड्यात औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या समाधीस्थळी गेले होते. तिथे त्यांनी औरंजेबाच्या कबरीवर चादर चढवली होती. त्यांच्या या कृतीमुळे ठाकरे गटही अडचणीत आल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गाधीचे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज प्रकाश आंबेडकर यांना चांगलंच फटकारलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रास देणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खून करणाऱ्या व्यक्तीचं कौतुक कुणी कसं करु शकतो? असा सवाल संभाजीराजे यांनी केलाय. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या कृतीवर प्रचंड नाराजी व्यक्त केलीय. तसेच आपण प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करणार नाही, असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे.
संभाजीराजे यांची ही भूमिका समोर आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण औरंगजेबाच्या कबरीसमोर का झुकलो? याचं कारण सांगितलं. यावेळी त्यांनी खूप मोठा दावा देखील केलाय. आपण औरंगजेबाच्या समाधीस्थळी जावून भेट दिली त्यामुळे महाराष्ट्रातील दंगली थांबवण्यात आपल्याला यश आलं, असं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांच्या या दाव्यावर आता इतर पक्षाचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
“संभाजीराजे संगमेश्वरला का गेले? यावर वाद आहे. त्यांची माहिती औरंगजेबपर्यंत कशी पोचली? जयचंदमुळे गेले, असा इतिहास आहे. औरंगजेबाने जो दंड दिला त्याची आम्ही निंदा करतो. गणोजी शिर्के, रामनाथ स्वामी यांनी संभाजीराजे संगमेश्वरला असल्याची माहिती पोहोचवली”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
आपण औरंगजेबचा जितका निषेध करतो तितका शिर्के, आबा भटजी यांचाही निषेध करायला हवा. हे वस्तुस्थितीला धरून नाही. हिंदू, मुस्लिम, जैन, हिंदू हा वाद जो देशात होतोय त्याबाबत जो इतिहास दिला जातो तो बरोबर नाही. संभाजीराजे यांच्या हत्येत हिंदू सहभागी होते”, असंही ते म्हणाले.
“मी कबरीवर फुलं वाहिली, माझ्या निर्णयामुळे जी दंगल झाली असती ती थांबली. अनेकजण कबरीवर गेले आहेत. संभाजीराजेंना जी शिक्षा झाली त्याची मी निंदा करतो”, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.