आरदाळ ता.आजरा येथे गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी नविन पाण्याची टाकी सह पाईपलाईन व जॅकवेल बांधण्याचे काम चालू आहे. त्यामधील पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. एकूण पाण्याच्या स्कीम साठी 75 लाखाचे काम चालू असून जॅकवेल विहीरीचे काम अंतिम टप्प्यात आहे; जॅकवेलचे काम कांक्रेटीकरणा सह पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सरपंच रुपाली पाटील व उपसरपंच विद्याधर गुरव यांनी सांगितले.
गावाला नियमितपणे पाणीपुरवठा करण्यासाठी ज्या विहीरीचा उपयोग होतो त्या विहिरीला व जॅकवेलच्या कामाला गावातील महिलांनी परंपरेनुसार आंबील घुगऱ्यांचा कार्यक्रम सरपंच रुपाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. गावचे ग्रामदैवत श्री भैरीदेव मंदिरापासून आंबील व दुरड्यांची मिरवणूक वाजत गाजत जॅकवेल पर्यंत नेण्यात आल्या. त्या ठिकाणी सर्व सहभागी महिलांचे स्वागत करून ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. बांधकाम कामगारांचा सत्कार ही करण्यात आला यामध्ये विहिरीवर काम करणारे मजूर, ट्रॅक्टर चालक, जेसीबी चालक, ग्रामपंचायत कर्मचारी जालिंदर डवरी, विनायक कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. उपसरपंच विद्याधर गुरव यांनी स्वतः लक्ष घालून जॅकवेल चे काम चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल त्यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला.
ग्रा.पं. प्रत्येक वार्ड व गल्लीतून वेगवेगळ्या पदार्थांच्या दुरड्या घेऊन महिला आल्या होत्या. या कार्यक्रमास शिवाजीराव जाधव, अंबाजी तोरस्कर, सूर्यकांत पाटील, शिवाजी गुरव, विठ्ठल पोवार , रवींद्र पाटील, सुहास शिवणे, संभाजी गुरव यांच्यासह ग्रामस्थ यांचेसह महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर महाप्रसाद वाटप करून कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.