दोन तास चालली बैठक!
बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यासह काही प्रशिक्षकांच्या शिष्टमंडळानं काल मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही बैठक तब्बल दोन तास चालली. या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं? यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही. पदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यानं “आमची केंद्रीय गृहमंत्र्यांशी बैठक झाली. याहून जास्त माहिती मी देऊ शकत नाही”, अशी माहिती दिली. त्यामुळे आता या बैठकीत नेमकं काय घडलं? याविषयी तर्क-वितर्क सुरू असून आज अल्टिमेटम संपत असल्यामुळे कुस्तीपटू नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट हे तिघे हे आंदोलन सुरू झाल्यापासून आंदोलनाच्या अग्रस्थानी आहेत. त्यांच्यासह अनेक कुस्तीपटू आणि प्रशिक्षकही आंदोलनात दिसत आहेत. कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी कुस्तीपटूंनी आंदोलनाची भूमिका कायम ठेवली आहे.
ब्रिजभूषण यांच्यावरील गुन्ह्यात नेमकं काय?
ब्रिजभूषण सिंह यांच्यावर दोन गुन्हे दिल्ली पोलिसांनी दाखल केले आहेत. त्यामध्ये, नोकरीच्या बदल्यात लैंगिक सुखाची मागणी करण्याची दोन प्रकरणं, लैंगिक छळाची १० प्रकरणं, विनयभंग, लैंगिक हेतूने रोखून पाहाणं अशा आरोपांचा समावेश आहे.