पंजाबसाठी सलामीला उतरलेल्या प्रभसिमरन सिंगने १९ चेंडूत २२ धावांची खेळी केली. परंतु, तो अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. कर्णधार शिखर धवनला तर भोपळाही फोडू दिला नाही. इशांत शर्माने पहिल्या चेंडूवर धवनला डक आऊट केलं आणि पंजाबला मोठा धक्का दिला. त्यानंतर अथर्व तायडे आणि लियाम लिविंगस्टोनने दिल्लीच्या गोलंदाजांना धुव्वा उडवला आणि अर्धशतकी खेळी केली. तायडेनं ४२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं ५५ धावांची खेळी साकारली. तर लियाम लिविंगस्टोनने ४८ चेंडूत ९ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीनं ९४ धावा कुटल्या. परंतु, लियामला पंजाब किंग्ज संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आलं. दिल्लीसाठी इशान शर्मा आणि नॉर्कियाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर खलील अहमद आणि अक्षर पटेलला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.
दिल्लीसाठी वॉर्नरने ३१ चेंडूत ४६ धावा कुटल्या. तसंच पृथ्वी शॉनेही धडाकेबाज फलंदाजी करत ३८ चेंडूत ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रायली रोसोने पंजाबच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत ३७ चेंडूत ८७ धावा कुटल्या. तर फिल सॉल्टने १४ चेंडूत २६ धावांची नाबाद खेळी साकारली.पंजाब किंग्जसाठी सॅम करनने भेदक मारा करून वॉर्नर आणि पृथ्वी शॉला बाद करून दिल्लीला मोठा धक्का दिला. पंरतु, रोसोने चौफेर फटकेबाजी करण्याचा धडाका सुरुच ठेवला. त्यामुळे दिल्लीच्या धावसंख्येचा आलेख उंचावला होता.