हेरे सरंजामच्या खातेदारांनी अर्ज करावे - भाजप नेते शिवाजी पाटील यांचे आवाहन

KolhapurLive

चंदगड : हेरे सरंजाम इनामाखाली जमिनी खातेदार धारण करीत आहेत, अशा सर्व खातेदारांनी विहित नमुन्यातील अर्जामध्ये गट नंबर, सर्व्हे नंबर नोंद करून सातबारा व फेरफार उताऱ्यासह अर्ज चंदगड कार्यालयात अथवा गावागावातून होणाऱ्या  कॅम्पमध्ये जमा करावेत, असे आवाहन भाजपाचे राज्य माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केले आहे.
चंदगड तालुक्यातील ४७ महसुली गावांमध्ये हेरे सरंजाम जमिनीचा समावेश असून वाडी विभाजन नंतर सदरची ५५ गावे झालेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने चंदगड मंडळ २१, हेरे मांडळ २, नागनवाडी मंडळ २८ व माणगाव मंडळ ४ अशा ५५ गावांचा सदरच्या मंडळांमध्ये समावेश आहे. सदर गावांचा हेरे सरंजाम प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 
बैठकीत मार्गी लावण्यात आला आहे.
महसूल मंत्री यांनी यामध्ये येणाऱ्या शासकीय अडचणी दूर करण्याचे यावेळी निर्देश दिले होते. या बैठकीत शेतीसाठी वापराच्या जमिनीची शासकीय रक्कम स्वामी प्रतिष्ठान मार्फत भरण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार चंदगड येथे अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. तसेच येत्या आठ दिवसात शासनाच्या सहकार्याने  गावोगावी कॅम्प लावून अर्ज भरून घेण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.