धोनी काय बोलणार याचीच उत्सुकता!
दरम्यान, अंतिम सामन्यात थरारक विजय मिळवल्यानंतर आता महेंद्रसिंह धोनी त्याच्या करिअरबद्दल नेमका काय निर्णय घेणार? याची उत्सुकता सीएसकेबरोबरच देशभरातील त्याच्या चाहत्यांना लागून राहिली होती. खुद्द धोनीनंही तशा प्रकारचे सूतोवाच आधी दिल्यामुळे आता जेतेपद जिंकल्यानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करणार का? याकडे अवघ्या क्रीडाविश्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. यावर धोनीनं मोठी घोषणा केली आहे.
“मी गेल्या वेळी सीएसकेनं आयपीएल स्पर्धा जिंकली तेव्हा तुला विचारलं होतं की तू सीएसकेसाठी कोणता वारसा मागे सोडून जात आहेस? तेव्हा तू म्हणाला होतास मी अजून कोणताही वारसा मागे सोडलेला नाही”, एवढं बोलून हर्षा भोगले थांबला आणि धोनीनं उत्तर द्यायला सुरुवात केली.
“तर तुम्हाला आता उत्तर हवंय? जर तुम्ही परिस्थितीचा विचार केला तर मी आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. मी या सीजनमध्ये जिथे कुठे सामने खेळायला गेलो, तेव्हा चाहत्यांचं माझ्यावरचं प्रेम पाहाता माझ्यासाठी त्यांना धन्यवाद म्हणणं ही फार सोपी बाब आहे. पण पुढचे ९ महिने मेहनत घेऊन पुढच्या आयपीएल सीजनमध्ये खेळण्यासाठी पुन्हा येणं ही माझ्यासाठी कठीण बाब आहे. पण मला ही गोष्ट माझ्या चाहत्यांसाठी करायची आहे”, असं धोनीनं म्हणताच मैदानावर उपस्थित हजारो प्रेक्षकांनी धोनी-धोनी नावाचा गजर सुरू केला.
“माझ्या शारिरीक स्वास्थ्यावर, फिटनेसवरही हे अवलंबून असेल. हे ठरवण्यासाठी माझ्याकडे ६ ते ७ महिने आहेत. मला वाटतं हे माझ्याकडून माझ्या चाहत्यांसाठी एक प्रकारचं गिफ्ट असेल. हे माझ्यासाठी फार कठीण असणार आहे. पण चाहत्यांनी मला दिलेलं प्रेम पाहाता हे माझं त्यांच्यासाठी गिफ्ट असेल. ही अशी गोष्ट आहे, जी मला माझ्या चाहत्यांसाठी करायची आहे”, असं धोनी म्हणाला.
चेपॉकमध्ये धोनी भावनिक?
दरम्यान, चेपॉकमध्ये तू भावनिक झाला होतास, असं हर्षा भोगलेनं विचारल्यावर धोनीनं त्यावर स्पष्टीकरण दिलं. “हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा आहे. यंदाच्या माझ्या IPL सीजनला इथूनच सुरुवात झाली. मी जेव्हा पॅव्हेलियनमधून खाली उतरलो आणि पाहिलं की सगळं स्टेडियम माझं नाव घेत आहे, तेव्हा माझे डोळे भरून आले. मी डगआऊटमध्ये थोडा वेळ थांबलो. मी माझा वेळ घेतला आणि स्वत:ला सांगितलं की मी हा क्षण एन्जॉय केला पाहिजे. तेच चेन्नईतही घडलं. तो माझा चेन्नईतला शेवटचा सामना होता. पण मला शक्य त्या पद्धतीने तिथे जाऊन पुन्हा खेळणं आता चांगलं ठरेल”, असं म्हणत निवृत्तीबाबत स्पष्टपणे निर्णय जाहीर न करता धोनीनं आयपीएलच्या पुढील सीजनमध्ये पुन्हा खेळण्याचे संकेत दिले.