गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात बी. बी. ए. भाग तीनच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक श्री काशिनाथ बाळासाहेब गुरव उपस्थित होते. तर संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक बी.बी.ए. विभाग प्रमुख प्रा. आर.डी.कमते यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे काशिनाथ बाळासाहेब गुरव यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये- व्यवसाय कसा करावा. त्यातून अर्थार्जन कसे करणे गरजेचे आहे. मिळविलेल्या उत्पन्नातून विविध लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक वेळीच करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्यवसाय करताना व्यावसायिक तुलना करून त्याचा योग्य तो ताळमेळ बसविणे गरजेचे आहे. त्यातून तुम्ही आपली प्रगती नक्कीच करू शकता असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आजच्या विद्यार्थ्यांनी नोकरीपेक्षा व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगून त्यादृष्टीने आतापासून व्यावसायिक नियोजन करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन श्री काशिनाथ गुरव यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. एस.एम.कदम, संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे, विना- अनुदानित विभाग समन्वयक प्रा. आझाद पटेल आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बी.बी.ए. चे विद्यार्थी युवराज बाडकर, सायली देसाई यांनी मनोगतातून ऋण व्यक्त केले.
या कार्यक्रमास, बी.सी.ए. विभाग प्रमुख प्रा. के. एस. देसाई, बी.एस्सी. ॲनिमेशन विभाग प्रमुख प्रा.बी.एस. पठाण, प्रा. सौ. प्राजक्ता तिनईकर, प्रा. श्रुती घस्ती यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रुती कुरणगे, पायल भदरगे, सायली देसाई, नकुशा अरगडे यांनी केले तर आभार प्रा. त्रिवेणी मस्ती यांनी मानले.