जैस्वाल-पडिक्कलच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानचा रोमहर्षक विजय, चार गडी राखून पंजाबवर केली मात

KolhapurLive

आयपीएल २०२३ मधील ६६ वा सामना सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर येथे खेळला गेला आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा ४गडी राखून पराभव केला. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने २० षटकांत ५ बाद १८७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १९.४ षटकांत १८९ धावा करत विजय नोंदवला. त्याचबरोबर प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. संघ आता १४ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
सलामीवीर यशस्वी जैस्वालने चांगली फलंदाजी केली. त्याने ३६ चेंडूंचा सामना करत ५० धावा केल्या. त्याने ८ चौकार मारले. देवदत्त पडिक्कलनेही अर्धशतक झळकावले. त्याने ३० चेंडूत ५१ धावा केल्या. देवदत्तने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. कर्णधार संजू सॅमसन काही विशेष करू शकला नाही. तो अवघ्या दोन धावा करून बाद झाला. जोस बटलर शून्यावर बाद झाला. रियान पराग १२ चेंडूत २० धावा करून बाद झाला. ट्रेंट बोल्ट १ आणि ध्रुव जुरेल ४ चेंडूत १० धावांवर नाबाद राहिला. त्याने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

सॅम करण आणि जितेश यांची शानदार फलंदाजी –

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांत ५ गडी गमावून १८७ धावा केल्या. यादरम्यान सॅम करनने नाबाद ४९ धावा केल्या. त्याने ३१ चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि २ षटकार ठोकले. जितेश शर्माने २८ चेंडूत ४४ धावा केल्या. त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले. शाहरुख खानने २३ चेंडूत ४१ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. तत्पूर्वी, लिव्हिंगस्टोन ९ धावांवर आणि अथर्व तायडे १९ धावांवर बाद झाले. शिखर धवन १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. प्रभसिमरन सिंग अवघ्या २ धावा करून बाद झाला.

नवदीप सैनीने राजस्थान रॉयल्ससाठी ३ बळी घेतले –

राजस्थान रॉयल्सकडून नवदीप सैनीने शानदार गोलंदाजी करताना ३ बळी घेतले. त्याने ४ षटकात ४० धावा दिल्या. ट्रेंट बोल्टने ४ षटकात ३५ धावा देत एक विकेट घेतली. अॅडम झाम्पाने ४ षटकात २६ धावा देत एक विकेट घेतली. संदीप शर्माने ४ षटकात ४६ धावा दिल्या. युजवेंद्र चहलने ४ षटकात ४० धावा दिल्या.

राजस्थानसाठी प्लेऑफचे समीकरण काय आहे?

या विजयानंतर राजस्थानचे १४ सामन्यात १४ गुण झाले आहेत. त्यांचा नेट रनरेट +०.१४८ झाला. आरसीबी आणि मुंबई इंडियन्सचेही १४-१४ गुण आहेत. मुंबईचा नेट रनरेट (-१२८) राजस्थानपेक्षा कमी आहे आणि सहाव्या क्रमांकावर आहे. या विजयानंतर संजू सॅमसनचा संघ पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. जर राजस्थान संघाने हा सामना १८.३ षटकांत जिंकला असता, तर त्याचा नेट रनरेट आरसीबी (०.१८०) पेक्षा चांगली असती, परंतु तसे झाले नाही. आता राजस्थान संघ प्रार्थना करेल की आरसीबीने गुजरात टायटन्सविरुद्धचा शेवटचा साखळी सामना मोठ्या फरकाने गमावावा. याशिवाय सनरायझर्स हैदराबादविरुद्धही मुंबईचा पराभव व्हावा.