आजरा : येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार आहे महापूर व अन्य गोष्टींमुळे आपत्ती उद्भवू शकते. अशा काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सजग व सतर्क रहावे हलगर्जीपणा दाखवल्यास संबंधिताला कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा तहसिलदार समीर माने यांनी दिला. येथील मुख्य प्रशासकीय इमारत सभागृहात आपत्ती व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. माने म्हणाले, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच विभागांनी जय्यत तयारी करण्याची गरज आहे. मनुष्य, पशुहानी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष काढण्यात येणार असून सर्वच विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय राखत काम केले पाहिजे चार महिन्यात कोणाचेही काहीही ऐकून घेतले जाणार नाही.
गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांनी व पिण्याचे पाणी व साथीचे रोगाबाबत आरोग्य यंत्रणेने पुरेशी दक्षता घेण्याविषयी सूचना केली. पाटंबधारे विभागाने धरणातील पाणी नियंत्रण व व्यवस्थापन, बांधकाम विभागाने वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, अन्नधान्य साठा, पुराच्यावेळी नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविणे, बोटीची व्यवस्था, धोकादायक अंगणवाडी व शाळा यासह विविध गोष्टींवर चर्चा केली. यावेळी निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, एसटीचे पृथ्वीराज चव्हाण, आयटीआयचे संदीप देसाई, मलिग्रे आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी रविंद्र गुरव, बालविकास प्रकल्प अधिकारी मनिषा कांबळे, नगरपंचायतीचे अधिकारी भोपळे उपस्थित होते. धनाजी चव्हाण यांनी आभार मानले.