गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय देशमुख यांचे प्रबोधनपर मार्गदर्शन व सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते. स्वागत प्राचार्य डॉ. एस. एम. कदम व प्रास्ताविक संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी केले. या कार्यक्रमात हायकोर्टच्या न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल न्यायमूर्ती संजय देशमुख यांचा सत्कार अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी प्रबोधनपर मार्गदर्शनामध्ये सततच्या व्यायामातून आपले शरीर सदृढ करणे आवश्यक आहे. सदृढ शरीरामुळे आपल्या जगण्यात एकप्रकारची शक्ती येते व चैतन्य निर्माण होते. त्यातून चांगल्या कार्याला एकप्रकारची उर्जा मिळते. त्यादृष्टीने आपण सर्वांनी घडले पाहिजे तरच ही मिळणारी उर्जा घेऊन आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी केले. आपण सतत वाचन करणे गरजेचे आहे जे वाचले ते मेंदूपर्यंत गेले पाहिजे तरच आपण यशस्वीपणे भविष्य घडवू शकतो असा विश्वास व्यक्त केला. वाईटांची संगत करू नका, चांगला असा त्याग करण्याचा प्रयत्न करा सुखाच्या मागे धावू नका. सुख प्रामाणिक वागण्यात आहे. सुख त्यागात आहे याची जाणीव ठेवा. व्यायामाबरोबर चांगला आहार घेणे गरजेचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आपल्या संवादातून विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूकउत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याचे त्यांनी कौतुक करून बक्षीसे देऊन गौरविले. यावेळी त्यांनी जीवनात माणूस कसा यशस्वी होतो. बुद्धी आणि ताकद मिळविण्यासाठी आपण काय करणे आवश्यक आहे. आजचा शेळपट उद्याचा योद्धा होण्यासाठी काय करणे गरजेचे आहे याबाबत त्यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात 'शिवराज २०२३' या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयास नॅकचे 'ए' ग्रेड मिळाल्याबद्दल शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांचा न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, अँड श्री पोवार यांच्यासह अन्य मान्यवर, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा पाटील यांनी केले तर आभार पर्यवेक्षक श्री तानाजी चौगुले यांनी मानले.