मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांना नगरविकास मंत्रीपद देण्याच्या बहाण्याने पैशांची मागणी करणाऱ्या नीरजसिंग राठोड याला पोलिसांनी अटक केली आहे. तसंच, ठाकरे गटात पदे विकली जातात, असा आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे मुखपत्र असले प्रहार करण्यात आले आहेत.
“जेथे ‘खोक्यांच्या बदल्यात सरकार’ स्थापन होते, तेथे ‘पैशांच्या बदल्यात मंत्रीपद’ असा ‘लिलाव’ करणाऱ्या भामटे आणि तोतयांचीच चलती दिसणार! कर्नाटकातील जनतेने ही भामटेगिरी ओळखली आणि तोडून-मोडून टाकली. महाराष्ट्रातही तेच घडणार आहे. कारण महाराष्ट्रातही ‘भामट्यांचे भामट्यांसाठी’ काम करीत असलेले सरकार सत्तेत आहे. नीरजसिंग राठोड प्रकरण हा त्याचाच पुरावा आहे.राज्यातील मिंधे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असण्यावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. मात्र ते भामटे आणि तोतयांचेही असल्याचा आरोप सिद्ध करणारी घटना आता घडली आहे,” असं म्हटलं आहे.
“भामटेगिरी आणि तोतयेगिरीचे पीक अलीकडेच देशात आणि महाराष्ट्रातही तरारून का येऊ लागले आहे? ज्या मातीत शूरवीर, क्रांतिकारक, देशभक्त, विद्वान, संत-महात्मे निर्माण झाले त्याच मातीत चोर, दरोडेखोर, ठग, लफंगे, भामटे, तोतये कसे निपजू लागले आहेत? या बदलाचा संबंध नेमका कशाशी आहे? मातीपेक्षाही ‘पेरणी आणि फवारणी’शीच त्याचा संबंध जास्त असावा. कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत मागील काही वर्षांत सर्वत्र भामटेगिरी आणि तोतयेगिरीचाच बोलबाला आहे. राजकीय गंडवागंडवी करून, फोडाफोडी करून राज्याराज्यांमध्ये सरकारे स्थापन करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून राबविला जात आहे. पोकळ घोषणा आणि आश्वासनांचे फुगे सोडून सामान्य जनतेची फसवेगिरी केली जात आहे. धर्मवाद आणि राष्ट्रवादाचे मुखवटे चढवून ढोंगीवादाला खतपाणी घातले जात आहे. सर्वत्र ही अशी ‘बोगस’ पेरणी आणि फवारणी केली जात असल्यानेच देशात भामटे आणि तोतयांची पैदास वाढली आहे का? सत्तापक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्याच नावाने त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना लाखो-करोडोंच्या बदल्यात मंत्रीपदाचे गाजर दाखविण्याचे धाडस त्यातूनच मिळत आहे का? पुन्हा हेच जर दुसऱ्या राजकीय पक्षाबाबत घडले असते तर भाजपमधील भामट्यांनी दिवट्या पेटवून राजकीय शिमगा केला असता. त्यांच्या सायबर फौजांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असता”, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.
“जनतेला खोट्या आश्वासनांचा गंडा घालून, बनावट राष्ट्रवादाचा ‘गंडा बांधून’ सत्तेचा शिमगा करणाऱ्यांच्या, शिवसेनाप्रमुखांचे ऋण विसरून शिवसेनेतील गद्दारांच्या मदतीने महाराष्ट्र धर्माच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या राजवटीत भामटेगिरी आणि तोतयेगिरीच फैलावणार!”, अशीही टीका करण्यात आली आहे.