चंदगड : हलकर्णी येथील मनाली मधुकर सावंत (वय १८) हिने बारावी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. याची वर्दी शिवाजीराव सावंत यांनी चंदगड पोलिसात रविवारी दिली.बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाल्यानंतर परीक्षेत कमी टक्केवारी मिळाल्याने मनाली सावंत नैरश्यात होती. शनिवार, २७ रोजी रात्री अकरा वाजल्याच्या सुमारास राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील तुळीला तिने दोरीने गळफास लावून घेतला. काही वेळानंतर मनालीची आई संगीता या दुसऱ्या मजल्यावर गेल्या असता मुलीने गळफास लावून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरडा केला.आजूबाजूचे लोक जमा झाले गळफास सोडवून तिला खाली उतरवले ती बेशुद्ध अवस्थेत होती. तिला उपचारासाठी बेळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरनी सांगितले.घटनेचा पंचनामा चंदगड पोलिसांनी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.