देवदासी, जोगते, व्याघामुरळीचे प्रश्न तातडीने सोडवा-बापूसाहेब म्हेत्री

KolhapurLive

समाजातील देवदासी, जोगते, वाघ्यामुरळी यांचे प्रश्न गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित आहेत. समाजातील या उपेक्षित घटकांना विविध सवलती मिळाव्यात अशी मागणी करूनही त्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. संबंधिताच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देवदासी निराधार मुक्ती केंद्राचे सचिव बापूसाहेब म्हेत्री यांनी दिला आहे.

देवदासी, जोगते आणि वाघ्यामुरळी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी यापूर्वी मेळावे, बंद, उपोषण आदी आंदोलनासह निवेदन देवून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाने देवदासी पुनर्वसनासाठी अभ्यास गट स्थापन केला. या अभ्यास गटाच्या शिफारसी येऊन ही अद्याप देवदासीचे संपूर्ण प्रश्न सुटले नाहीत. शासनाने

राज्यात देवदासीचा कायदा करून अंमलबजावणी करावी. देवदासी प्रथा नष्ट करण्यासाठी नियंत्रण मंडळ स्थापन करावे. देवदासी, जोगते वाघ्यामुरडी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी एक खिडकी योजना लागू करावी. या उपेक्षित घटकांचे फेर सर्वेक्षण करावे, गडहिंग्लज येथील देवदासी वसतीगृहाच्या इमारतीच्या प्रश्न सोडवावा यासह देवदासींना घरकुल, मासिक पेन्शन, वारसांना नोकरी, रेशनवर धान्य प्रवासात सवलत आदी मागण्या केल्या आहेत. ३० जून पर्यंत शासनाने या मागण्या सोडवाव्यात अन्यथा प्रांत कार्यायल, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन छेडण्याचा इशारा सविस्तर निवेदनातून दिला आहे.