गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे बुधवारपासून दि.१७ डेव्हलपमेंट फुटबॉल लीग स्पर्धेला प्रारंभ होत आहे. २३ मे अखेर ही स्पर्धा सुरू राहणार आहे. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या शिवराज युनायटेड ट्रॉफीसाठी ५० हजाराची पारितोषिके आहेत. रोज सायंकाळच्या सत्रात दोन सामने होणार आहेत.
कुमार आणि युवा खेळाडूंना अधिक सामने खेळण्याचा अनुभव मिळावा हाच या स्पर्धेचा हेतू आहे. १५, १८, आणि २१ वर्षाखालील खेळाडूंचा समावेश संघात आहे. गेले पंधरा दिवस निवडलेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गोव्याचे कार्लोस गोम्स यांनी मार्गदर्शनाची केले. सायंकाळी साडेचार वाजता शिवराज शिक्षण संकुलाचे प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते स्पर्धेला प्रारंभ होईल. यावेळी तहसिलदार ऋषिकेत शेळके, पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक सामन्यात विजयी संघातील खेळाडूस सामनावीर तर पराभूत संघातील खेळाडूस लढवय्या म्हणून क्रीडासाहित्य देऊन गौरव केला जाणार आहे.