काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
“मी आता सातारा दौऱ्यावर आहे. इथे येऊन मी तापोळ्यातील पुलाची पाहणी केली आणि तापोळा महाबळेश्वर रस्त्याचे भूमिपूजनही केले. तसेच महाबळेश्वर येथील पर्यटनांच्या दृष्टीनेही आढावा बैठकही घेतली, त्यामुळे मी सुट्टीवर आहे, हे खरं नाही. खरं तर मी डबल ड्युटीवर आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
पुढे बोलताना बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. “विरोधक माझ्यावर आरोप करतात.कारण त्यांच्याकडे काहीही कामं शिल्कल राहिलेले नाही. त्यांना आरोप केल्याशिवाय दुसरं कोणतंही काम नाही. आम्ही त्यांना घरी बसवलं आहे. त्यामुळे ते आरोप करतीलच. मात्र, आम्ही त्यांना आरोपाचं उत्तर आरोपाने नाही, तर कामाने देऊ”, असे ते म्हणाले. तसेच “मी साताऱ्यात येऊन आराम केलेला नाही. साताऱ्यात आल्यानंतर अनेक जण भेटायला आले. येथील जनतेचे प्रश्न सोडवण्यावर माझा भर आहे. त्यासाठी सातत्याने बैठका होत आहेत”, असंही त्यांनी नमूद केलं.
सुषमा अंधारेंनी लगावला होता टोला
दरम्यान, मुख्यमंत्री रजेवर असल्याच्या चर्चेवरून काल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या टोला लगावला होता. “मुख्यमंत्री तीन दिवस रजेवर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या गावात महापुजेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. माणूस संकट काळात पुजा अर्चना करत असतो. आता त्यांच्यासाठी जरा संकटाचा काळ आहे. मागे त्यांनी शिर्डी आणि कामाख्याला जाऊनही पुजा केली होती”, असे त्या म्हणाल्या.