गडहिंग्लज, ता. ९ : करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील सोनाबाई गुंडू पन्हाळकर यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. करंबळी गावातील हे चौथे तर चळवळीतील ८७ नेत्रदान ठरले. पन्हाळकर कुटुंबीयांच्या आदर्शवत निर्णयामुळे करंबळी गावात चळवळीला गती मिळाली आहे.
अत्याळनंतर नेत्रदान चळवळीची सुरुवात करणारे करंबळी पहिले गाव आहे. २०१४ साली करंबळीत चळवळीची सुरुवात झाली. पहिल्या तीन वर्षांत दोन व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान झाले होते. मात्र, त्यानंतर पाटी कोरीच होती. दरम्यान, पाच महिन्यापूर्वी शांताबाई कदम यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. तर आज पहाटे सोनाबाई पन्हाळकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांनी नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर येथील अंकुर आय बँकेच्या पथकाने करंबळी येथे जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली.
गेल्या पाच महिन्यात दोन व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान झाल्याने करंबळी गावात चळवळीला गती मिळाल्याचे चित्र आहे. सोनाबाई यांच्या मागे दोन मुली, जावई, पुतण्या असा परिवार आहे. येथील डॉ. घाळी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक हरीभाऊ पन्हाळकर यांच्या त्या चुलती होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता.१२) सकाळी नऊला आहे.